Tue, Apr 23, 2019 22:10होमपेज › Sangli › आमदारांकडून शामरावनगरचे ‘पोस्टमार्टेम’

आमदारांकडून शामरावनगरचे ‘पोस्टमार्टेम’

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:47PMसांगली : प्रतिनिधी

पावसाळ्याच्या तोंडावर शामरावनगरातील दुरवस्था आणि नरकयातनेचा विषय ऐरणीवर आला. नागरिकांच्या तक्रारींमुळे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सोमवारी दलदल, घाणीत रुतलेल्या शामरावनगरातील गल्लीबोळात फिरून पंचनामा केला. मुरुमीकरणाची कामे वेळेत न केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि  पाणीपुरवठ्यातील ढिसाळ कारभाराबद्दल मनपा आयुक्‍तांशी मोबाईलवरून संपर्क साधत खडे बोल सुनावले. 

तक्रारी करणार्‍या नागरिकांनाही गाडगीळ यांनी वर्षानुवर्षे येथे राहून दुरवस्था कशी सहन करता, असा सवाल केला. दुरवस्थेस कारणीभूत असणार्‍या नगरसेवकांना चार-चारवेळा कसे निवडून देता, असाही सवाल  त्यांनी विचारला. लागेल तेवढा मुरुम मी भाजपच्यावतीने देतो. पण गल्ली-बोळातील रस्त्यांचे मुरुमीकरण करा. पावसाळ्यात लोकांना घराबाहेर पडताना त्रास होता कामा नये, असेही आदेश त्यांनी दिले.

दलदलीत रुतलेल्या शामरावनगरात पुन्हा दोन दिवसांतील पावसाने दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेजमुळे गल्ली-बोळच काय, मुख्य रस्तेही गुडघाभर चिखलात रुतले आहेत.  याबाबत सर्वपक्षीय कृती समिती, नागरिकांनी आंदोलन करूनही महापालिकेमार्फत उपाययोजना झाल्या नाहीत. शिवाय मनपा-आमदार निधीतून रस्तेकामांचा वाद सुरूच आहे.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत  आमदार गाडगीळ, अभियंता ए. ए. क्षीरसागर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी शामरावनगरकडे मोर्चा वळविला. अरिहंत कॉलनी, महसूल कॉलनी, सुंदर कॉलनी, विठ्ठलनगर, अष्टविनायक कॉलनी, समता कॉलनीचे सर्वच रस्ते, अंतर्गत बोळ ड्रेनेज खोदाईने गुडघाभर काळ्या मातीच्या चिखलात रुतले आहेत. 

श्री. गाडगीळ यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साळुंखे यांना दूरध्वनी केला. ‘तुम्ही एसीत बसून अधिकार  गाजवा. लोक येथे आम्हाला जाब विचारत आहेत’ असे  सुनावताच साळुंखे  धावत आले. त्यांनी मुरुमीकरणाची कामे सुरू असल्याचा खुलासा करताच गाडगीळ भडकले. काम कुठे सुरू आहे, अशा पध्दतीने कधी मुरुम पडणार, असा जाब त्यांनी विचारला. अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन लिकेज झाल्याचे आणि सांडपाणी निचर्‍याची व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या. यावर गाडगीळ यांनी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर, पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांना फैलावर घेतले. 

नागरिकांनी श्री. गाडगीळ यांच्यासमोर उपेक्षितांचे जीणे जगत असल्याच्या तक्रारी केल्या. नगरसेवक, अधिकारी फिरकत नाहीत असेही सांगितले.  गाडगीळ  हसत-हसत  म्हणाले, आता तुम्ही  तक्रारी माझ्याकडे करता. पण येथे किती वर्षे राहता ? यावर काहींनी अनेक वर्षे राहत असल्याचे आणि हालअपेष्टा सहन करीत असल्याचे सांगितले. यावर श्री. गाडगीळ म्हणाले, एवढी वर्षे येथे राहून तुम्ही दुरवस्था सहन करता. मग या लोकांना चार-सहावेळा तुम्ही निवडूनच कसे दिले? यावर नागरिकांनीही प्रत्युत्तर देत यावेळी त्यांचा हिशेब करू असे स्पष्ट केले.तसेच तुम्ही रस्ते  करा, समस्या सोडवा पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी लावू, असे स्पष्ट केले. गाडगीळ यांनी शंभर दोनशे ट्रक मुरुम लागू दे पण  सर्व रस्ते चिखलमुक्‍त करू. पावसाळ्यानंतर रस्ते डांबरी करू, असे आश्‍वासन दिले. 

भाजपचे शहराध्यक्ष शरद नलावडे, विक्रम पाटील- सावर्डेकर, संदीप दळवी, अमर पडळकर, रज्जाक नाईक, युवानेते सुयोग सुतार, सुब्राव मद्रासी, सुधाकर पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.