Sat, Jul 20, 2019 21:52होमपेज › Sangli › शामरावनगरवासियांचे जिल्हाधिकार्‍यांसमोर लोटांगण

शामरावनगरवासियांचे जिल्हाधिकार्‍यांसमोर लोटांगण

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 10:56PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत दोन दिवस झालेल्या पावसामुळे शामरावनगरातील नागरिकांना पुन्हा नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याबाबत आंदोलने करून महापालिकेकडून काहीच उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे शनिवारी नगरसेवक राजू गवळी, समाजिक कार्यकर्ते संदीप दळवी, अमर पडळकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना भेटून त्यांच्यासमोर  अक्षरश: लोटांगण घातले. 

दुरवस्थेबद्दलचे गार्‍हाणे मांडताना अनेक नागरिकांना रडू कोसळले. काही करून आपत्कालिन आराखडा राबवा आणि  आमची या समस्यांतून सुटका करा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर  त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ व आयुक्‍तांची भेट घेवून शामरावनगर परिसर आपत्कालिन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी केली. 

नगरसेवक गवळी,  संदीप दळवी, अमर पडळकर, ज्योती आदाटे, शहाजी भोसले, अर्जुन कांबळे, अश्ररफ वांकर, शैलेश पवार आदींनी थेट श्री. काळम-पाटील यांची शनिवारी भेट घेतली.

गवळी  म्हणाले,  महापालिका लक्ष देत नाही, साहेब तुम्ही तरी लक्ष द्या. दळवी, पडळकर यांच्यासह अनेकांनी तर जिल्हाधिकार्‍यांसमोर  लोटांगण घातले. ‘साहेब आता आम्हाला सहन होत नाही. राहणे आणि जगणे कठीण झाले आहे’ अशी व्यथा त्यांनी मांडली.  त्यामुळे जिल्हाधिकारी पाटीलही भावूक झाले. त्यांनी तत्काळ  आयुक्‍त खेबुडकर यांना महापालिकेमार्फत उपाययोजना करण्याचे  आदेश दिले.  सोमवारी ते या परिसराची पाहणी करतील, असेही त्यांनी जाहीर  केले. आंदोलकांनी आयुक्‍त खेबुडकर यांना भेटून आपत्कालिन आराखडा राबविण्याची मागणी केली. निविदा आणि मंजुरीचे खेळ न करता तत्काळ  अत्यावश्यक सेवेच्या अधिकाराचा वापर करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

पडळकर, वांकर म्हणाले, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने शासन निधीतून अडीच कोटी रुपयांचे रस्ते काम मंजूर आहे. मात्र तेथे सांडपाणी निचर्‍याची सोय नसल्याने पावसाळ्यात ते रस्ते वायाच जाणार आहेत. त्याऐवजी सध्या डांबरी रस्त्यांपेक्षा मुरूमाचे रस्ते होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने निधी द्यावा.दळवी म्हणाले, मनपाने ड्रेनेज चरी बुजविण्यासाठी सव्वा कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. मात्र  चरी बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. शामरावनगरच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र सक्षम अधिकारी नियुक्‍त करावा. 

खेबुकर म्हणाले, परिसरातील चरींच्या कामासह दुरवस्थेची  उपायुक्‍त सुनील पवार पाहणी करतील.  उपाययोजनांसाठी ते मोहीम राबवतील. यावेळी उपस्थितांनी या परिसरात नागरी आरोग्यासाठी मेडिकल कॅम्प घ्यावा व एक रूग्णवाहिका सुरू करावी, अशी मागणी केली.