सांगली : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानास पात्र चौथ्या टप्प्यातील सुधारित यादीत सुमारे सात हजार शेतकरी ‘डबल लाभार्थी’ ठरले आहेत. पहिल्या, दुसर्या व तिसर्या यादीतील लाभार्थी नावेही चौथ्या टप्प्यातील सुधारित यादीतही आली आहेत. शासनाकडून आलेल्या या यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याने हा प्रकार घडला आहे. सुधारित यादीची तपासणी व त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू आहे. या यादीतील पात्र शेतकर्यांना लाभ देण्याचे थांबविले आहे.
कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्यातील यादीला तांत्रिक चुकांमुळे त्रुटींचे ग्रहण लागले आहे. चौथ्या टप्प्यातील यादी दि. 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. मात्र, लगेचच दुसर्या दिवशी सकाळी पहिली यादी थांबवत शासनाकडून दुरुस्त यादी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर आली. दरम्यानच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव प्रोत्साहन यादीत आल्याने विधानसभेत पडसाद उमटले. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी आमदार अपात्र असतानाही आमदार आबिटकर ‘लाभार्थी’ ठरल्याने शासनाने हा प्रकार गंभीरपणे घेतला. बँकांना पाठविलेली चौथी दुरुस्त यादी शासनाने थांबविली. या दुरुस्त यादीत सुधारणा करून नव्याने सुधारित यादी दि. 22 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर पाठविली.
चौथ्या टप्प्यातील या सुधारित यादीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ‘ओटीएस’साठी 19 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकर्यांना सुमारे 36 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. या सुधारित यादीनुसार पात्र शेतकर्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली. मात्र यादीची तपासणी करताना त्रुटी आढळून आल्या. पहिल्या, दुसर्या व तिसर्या यादीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरलेले सुमारे 7 हजार शेतकर्यांची नावे चौथ्या टप्प्यातील सुधारित यादीत आली आहेत. दरम्यान ‘डबल लाभार्थी’ प्रकार जिल्हा बँकेने शासनाच्या निदर्शनास आणला. सुधारित यादीची तपासणी व त्रुटी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्रुटी दुरुस्त केलेली यादी शासनाला सादर होईल व शासनाकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास सुरूवात होईल.
चौथ्या टप्प्यातील यादी तिसर्यांदा सुधारित होणार
चौथ्या टप्प्यातील यादीत कर्जमाफीस पात्र शेतकरी 4438 (रक्कम 15.59 कोटी), प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकरी 15965 (रक्कम 23.23 कोटी), ओटीएससाठी पात्र शेतकरी 1519 होते. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसर्या दिवशी दुरुस्त यादी आली. त्यामध्ये कर्जमाफीस पात्र शेतकरी 3074 (रक्कम 10.78 कोटी), प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकरी 25423 (रक्कम 39.20 कोटी), ओटीएससाठी पात्र शेतकरी 799 होते. चौथ्या टप्प्यातील सुधारित यादीत कर्जमाफीस पात्र शेतकरी 3723 असून कर्जमाफीची रक्कम 13.56 कोटी रुपये आहे. प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकरी 14740 असून 16.68 कोटी अनुदान मिळणार आहे. ओटीएससाठी 804 शेतकरी पात्र आहेत. दरम्यान, सुधारित यादीतही त्रुटी आढळून आल्या आहेत. सुमारे 7 हजार शेतकरी ‘डबल लाभार्थी’ ठरत आहेत. चौथ्या टप्प्यातील चौथी सुधारित यादी आता येणार आहे.