Tue, Jul 23, 2019 07:17होमपेज › Sangli › तेरा कोटींच्या सेवाकर नोटिसीला आव्हान

तेरा कोटींच्या सेवाकर नोटिसीला आव्हान

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:38PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्हा माथाडी बोर्डाकडून दिल्या जात असलेल्या सेवेवर 12.73 कोटी रुपयांचा सेवाकर व्याजासह भरण्याची नोटीस कोल्हापूर विभागीय जीएसटी आयुक्तांनी दिली होती. याविरोधात जिल्हा माथाडी बोर्डाने केंद्रीय उत्पादन शुल्क सेवाकर व सीमाशुल्क लवाद मुंबई यांच्याकडे अपील केले आहे. 

सांगली जिल्हा माथाडी बोर्डाकडे सुमारे 6 हजार हमाल व महिला माथाडी कामगारांची नोंदणी आहे. त्यापैकी सध्या सुमारे 2 हजार 900 हमाल व माथाडी कामगारांना माथाडी बोर्डाकडून पगाराच्या स्वरुपात मोबदला मिळतो. हमाल, महिला माथाडी कामगार अडते, खरेदीदार व्यापारी, हळद गिरण विभागाकडे काम करतात. त्यांच्या कामाच्या मोबादल्याची रक्कम व लेव्हीची रक्कम संबंधित अडते, व्यापारी माथाडी बोर्डात जमा करतात. संबंधित रक्कम हमाल व महिला माथाडींच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते. 

सन 2011 ते 2016 या कालावधीतील हमाली व महिला माथाडींच्या कामाच्या मोबदल्यावर व्याजासह 12.73 कोटी रुपये सेवाकर आणि त्यावर 12.73 कोटी रुपये दंड भरावा, अशी नोटीस सेंट्रल एक्साईजच्या सांगली विभागीय कार्यालयाने जिल्हा माथाडी बोर्डाला बजावली होती. जिल्हा माथाडी बोर्डाचे अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्तांनी ‘जीएसटी’ कोल्हापूर विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी झाली होती. माथाडी बोर्ड हे हमाल व महिला माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन झालेले आहे. माथाडी बोर्ड नफा कमवत नाही. हे बोर्ड शासनाच्या अधिपत्याखाली काम करत आहे. त्यामुळे सेवाकर आकारू नये, अशी भूमिका मांडली होती. मात्र  ‘जीएसटी’च्या कोल्हापूर विभागीय आयुक्तांनी व्याजासह सेवाकराचे 12.73 कोटी रुपये भरण्याचा निकाल दिला होता. दंडाचे 12.73 कोटी रुपये मात्र माफ केले होते.

माथाडी बोर्डाने सेवाकराविरोधात मुंबई येथील केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर व सीमाशुल्क लवादाकडे अपिलासाठी अर्ज दिला होता. मात्र अपिलासाठी  सेवाकराच्या 7.5 टक्के रक्कम (95.50 लाख रुपये) भरणे आवश्यक होती. माथाडी बोर्डाने शासनाकडून तजवीज करून केंद्रीय जीएसटीच्या कार्यालयात चलनाद्वारे ही रक्कम भरली आहे.