Thu, Apr 25, 2019 16:22होमपेज › Sangli › बदल्यांमधील बोगसगिरीची शासनाकडून गंभीर दखल 

बदल्यांमधील बोगसगिरीची शासनाकडून गंभीर दखल 

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदांकडील जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांमधील बोगसगिरीची ‘ग्रामविकास’ने गंभीर दखल घेतली आहे. संवर्ग 1 व 2 अंतर्गत बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. 10 जुलैपर्यंत पूर्ण करावी.  खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करावी, असे परिपत्रक ‘ग्रामविकास’ने काढले आहे. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीत विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतली आहे व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी तात्काळ करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. या पडताळणीचे काम दि. 10 जुलै 2018 पर्यंत पूर्ण करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याची कार्यवाही करावी, असेही ग्रामविकासच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

विस्थापित झालेल्या शिक्षकांची मूळ जागी पुनर्पदस्थापना होणार

खोट्या माहितीच्या आधारे विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी बदल्या करून घेतल्या आहेत अशा शिक्षकांनी ज्यांना विस्थापित केले आहे अशा बदलीपात्र  शिक्षकांना रँडोमायझेशन राऊंड मध्ये बदली मिळाली असेल तर त्या शिक्षकाच्या पदावर खोटी माहिती भरून बदली करून घेतलेल्या शिक्षकाची बदली करावी आणि विस्थापित झालेल्या शिक्षकाला त्यांच्या मूळ जागी पूनर्पदस्थापना द्यावी. ही कार्यवाही दि. 20 जुलै 2018 पर्यंत करण्यात यावी. विस्थापित शिक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार बदली मिळालेली असल्यास खोट्या माहितीच्या आधारे  बदली करून घेतलेल्या शिक्षकांना पुढील वर्षी बदलीत थेट रँडम राऊंडमध्ये घेऊन त्यांची बदली करावी, असेही ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

बदली चुकवलेल्यांचे काय

संवर्ग 1 व 2 मध्ये अर्ज भरून खोट्या माहितीद्वारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश ‘ग्रामविकास’ने काढले आहेत. मात्र खोटी माहिती भरून बदली चुकवलेल्या शिक्षकांबाबत काय? त्याबाबत काहीच निर्देश नाहीत. पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत ‘इतर’ मध्ये कोणाला लाभ घेता येतो याबाबतची संदिग्धता कायम राहिली आहे. 

धरणे आंदोलन करता येणार नाही : सीईओंचे पत्र

शिक्षक बदल्यांमधील अनियमितता, त्रुटी विरोधात शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे शनिवारी (दि. 30) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन होणार आहे. त्यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बदल्यांमधील त्रुटींच्या अनुषंगाने विविध संघटना व शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असताना ग्रामविकास विभाग किंवा एनआयसी कडून शिक्षकांच्या तक्रार अर्जाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे धरणे आंदोलनासारख्या अतातायी मार्गाचा अवलंब करता येणार नाही. त्यामुळे आपण धरणे आंदोलनासारख्या मार्गांचा अवलंब करू नये. न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करावा.