Tue, May 21, 2019 13:03होमपेज › Sangli › संवेदनक्षम भाग; सुविधांचा अभाव

संवेदनक्षम भाग; सुविधांचा अभाव

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:20PMमिरज : जे. ए. पाटील

शहरात सराफकट्टा शनिवार पेठ पासून शिवाजीनगर, समतानगर, माणिकनगर, गंगानगरपर्यंत विस्तारलेल्या प्रभाग क्र. 7 मध्ये विकासकामांचा मोठा अभाव आहे. या ठिकाणी  राजकीय संघर्षातून अनेक विकासकामे लटकली आहेत. 

रस्ते डांबरीकरण, कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती, आरोग्य विषयक समस्या गंभीर आहेत. शहराचा विस्तारीत भाग हा  गुंठेवारीमध्ये येतो.  सराफकट्टा, शनिवारपेठ, सोमवारपेठ या भागात सराफपेठ व अन्यधान्य विक्रेत्यांची दुकाने आहेत.  गेल्या काही वर्षात या रस्त्यावरील सराफी दुकानांत मोठ्या चोर्‍याही झाल्या आहेत.  हा भाग संवेदनक्षम आहे. त्यामुळे या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यापारी व नागरिकांची मागणी अनेक वर्षांची आहे.  चोर्‍यांमुळे एका ठिकाणी  सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. तोही  बंद आहे.

गांधी चौकातून बॉम्बे बेकरीकडे येणार्‍या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अनेक वर्षे रखडले होते. खंडोबा मंदिरजवळ यापूर्वीचे चार प्रभाग एकत्र येत असल्याने डांबरी रस्त्याचे श्रेय कोणी घ्यायचे, या वादातून रस्ता  डांबरीकरणाचे कामच बंद पाडण्यात आले आहे. नागरिकांनी तक्रारी करुनही त्याचा उपयोग झाला नाही. या प्रभागातून बसडेपो ते गांधीचौक असा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.  या महामार्गाच्या  रुंदीकरणाचे कामही अनेक वर्षे रखडले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. परंतु रस्त्यामध्ये येणारे महावितरण कंपनीचे विद्युत खांब  काढण्यात आले नसल्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. या रस्त्यावर स्टँड चौक, हिरा हॉटेल चौक आणि गांधी चौकात यापूर्वी असलेली सिग्नल व्यवस्था आज अस्तित्वात  नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे कोणतेही नियोजन नाही.शहरातील शिवाजी स्टेडियम हे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. .

समस्या प्रभागाच्या 7

परिसर : सराफकट्टा, शनिवारपेठ, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, चर्च रस्ता, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग, शहर ग्रामीण बसस्थानक, रेल्वेस्थानक, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम डेपो, समतानगर, माणिकनगर, गंगानगर, जनावर बाजार आवार, शिवाजीनगर.