सांगली : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील 2166 शिक्षक बदल्यांची अंमलबजावणी मंगळवारी युद्धपातळीवर करण्यात आली. बदल्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’, असा प्रकार दिसून आला. बदलीसाठी पसंती दिलेल्या शाळा सीनिअर शिक्षकांना न मिळता ज्युनिअर शिक्षकांना मिळाल्याचे प्रकार घडले आहेत. भाषेच्या शिक्षकाला समाजशास्त्राच्या शिक्षकाने ‘खो’ दिल्याचा प्रकारही घडला आहे. समानीकरणाच्या जागेवरही बदली झाली आहे.
जिल्हा परिषदेकडील 2 हजार 166 शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली शासनस्तरावरून ऑनलाईन झाली आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी जिल्हा परिषदेला शिक्षक बदली कार्यमुक्तीचे आदेश दिले. हे आदेश डाऊनलोड करण्याची कार्यवाही सोमवारी झाली. मंगळवारी तातडीने हे आदेश गटशिक्षणाधिकार्यांकडून केंद्रप्रमुखांना व केंद्रप्रमुखांकडून मुख्याध्यापकांना देण्यात आले. मुख्याध्यापकांनी तातडीने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित शाळेत तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले होते. अन्यथा कारवाईचा बडगा उगारला होता.त्यामुळे बदली झालेले शिक्षक कार्यमुक्तीनंतर मंगळवारीच बदलीच्या ठिकाणी हजर झाले. बदल्यांमध्ये काही त्रुटीही आहेत.
बदलीपात्र सिनिअर शिक्षकांनी पसंती दिलेल्या शाळा त्यांना न मिळता कनिष्ठ शिक्षकांना मिळाल्या आहेत. संवर्ग 1 मधून बदली झालेल्या जागा रिक्त ठेवल्या आहेत. मात्र या जागेवर बदलीसाठी काही शिक्षकांनी पसंतीक्रम देऊनही त्यांना ती मिळालेली नाही. भाषा विषयाच्या शिक्षकाला भाषा विषयाच्या शिक्षकाने खो देणे आवश्यक होते. पण भाषेच्या शिक्षकाला समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकाने खो देण्याचा व अशाच प्रकारे विषय बदलून खो दिल्याचे काही प्रकार घडले आहेत. एकेका विषयाला शिक्षकच नाहीत, तर एका विषयाचे दोन-दोन शिक्षक शाळेत आले आहेत. सक्तीने रिक्त ठेवायच्या जागेवरही बदली; शिक्षकांना रिकॉल करणारसमानीकरणासाठी रिक्त ठेवायच्या जागा ऑनलाईन बदल्यांवेळी लॉक केल्या नव्हत्या. त्यामुळे कंपलसरी व्हॅकंट (सक्तीने रिक्त ) ठेवायच्या काही जागांवरही बदली झालेली आहे. त्या शिक्षकांना रिकॉल केले जाणार आहे. काही पती-पत्नी 30 किलोमीटर अंतराच्या बाहेर गेले आहेत. प्रशासकीय बदलीऐवजी विनंती बदल्यांना प्राधान्य दिल्याने काहींची गैरसोय झाली आहे. दरम्यान विस्थापित झालेल्या व पसंतीची शाळा न मिळालेल्या 126 शिक्षकांना पुन्हा पसंतीच्या शाळा नोंदविण्यासाठी दि. 29 ते 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्रशासनाने त्रुटींचा अहवाल मागविला; त्रुटी दुरुस्त न झाल्यास न्यायालयात याचिका
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यात काही त्रुटी, आक्षेप, तक्रार असतील तर बुधवारी त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे निर्देश गटशिक्षणाधिकार्यांना दिलेले आहेत. दरम्यान, त्रुटींची दुरुस्त न झाल्यास व शिक्षकांना न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती शिक्षक समिती व शिक्षक संघाने दिली आहे. त्रुटींची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटना, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारतीने केली आहे.