Tue, May 21, 2019 00:47होमपेज › Sangli › जाती-पातीची मुळे घट्ट होणे धोकादायक

जाती-पातीची मुळे घट्ट होणे धोकादायक

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:29AMसांगली : गणेश कांबळे

देशातील जातीपाती नष्ट करण्यासाठी लोकशाहीचा जन्म झाला. परंतु याच लोकशाहीचा वापर पुन्हा एकदा जाती-पातीची मुळे घट्ट करण्यासाठी केला जात आहे. हे लोकशाहीच्यादृष्टीने घातक असल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक  गो. मा. पवार यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केले. मराठी साहित्याला पूर्वीपेक्षा चांगले दिवस आल्याचेही त्यांनी सांगितले. 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याची ओळख करून देणार्‍या चरित्रग्रंथाचे लेखन पवार यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्‍नांची चर्चा या ग्रंथात केली आहे. ते सांगलीतील एका कार्यक्रमासाठी आले असता  त्यांच्याशी संवाद साधला. 

पवार म्हणाले, सामाजिक सुधारणा व्हाव्यात म्हणून गेल्या शतकात अनेक सुधारकांनी काम केले. त्याचे चांगले- वाईट परिणाम लोकशाहीत दिसून येत आहेत. परंतु भारतीय लोकशाहीत मतदानाच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा जाती-पातीला महत्त्व आले. राजकारणी लोक जाती-पातीचा गौरव करीत आहेत. हे समाजाला घातक आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या हयातीत त्यांना कोणी विचारले नाही, परंतु त्यांचा सध्या गौरव करणारे अनेकजण निर्माण झाले आहेत. राजमाता अहिल्यादेवी  होळकर यांना एका जातीत बंदिस्त केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही जातीपुरते बंदिस्त केले जात आहे,   हे अत्यंत वाईट आहे. 

वास्तविक पाहता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी जातीयता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर काम केले, त्यांचे नावही सध्या कोणी घेत नाही. महात्मा फुले यांच्यानंतर समाज सुधारणेचे काम खंडित झाले होते. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी ते सुरू केले. जातीजातीत प्रेम वाढावे, सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतभर दौरा करून त्यांनी जाती निर्मूलनाची चळवळ उभी केली. जातीचा कलंक पुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्यानंतर कोणीही नेता त्यांचे नाव घ्यायला तयार नाही. ही वाढणारी जातीयता धोकादायक असून, त्यासाठी लोकशिक्षण हा एकमेव उपाय असल्याचे ते म्हणाले. 

मराठी साहित्याला चांगले दिवस

मराठी साहित्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, सध्याचे मराठी साहित्य हे प्रगतीपथावर आहे. या साहित्याला पाश्‍चात्यांचे अनुकरण आणि गुलामीतून बाहेर काढण्याचे काम भालचंद्र नेमाडे यांनी केले. नेमाडे यांनी देशीवाद मराठी साहित्याला दिला. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक ग्रामीण भागातून लेखक पुढे आले. व्यकंटेश माडगूळकर, चारुता सागर यांच्यासारख्या ग्रामीण लेखकांनी भारतीय संस्कृती मराठी साहित्यात आणली. त्यामुळे आज अनेक ग्रामीण साहित्यिक आपल्याला दिसतात. पूर्वीच्या कादंबरी, कथेमध्ये रंजकता होती. त्यामुळे हे साहित्य खुरटे झालेले होते. परंतु नेमाड्यांच्या देशीवादामुळे अनेकजण या वाङमय प्रकाराकडे वळले. त्यामुळेच मराठी साहित्य समृद्ध होत असल्याचे ते म्हणाले.