Tue, Jan 22, 2019 22:39होमपेज › Sangli › इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेणार नाही : जयसिंगराव पवार

'इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेणार नाही'

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 29 2018 1:31AMविटा : प्रतिनिधी 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण करणे मान्य नाही. उद्या शिवराय किंवा जिजाऊंच्या बाबतीतही असे प्रकार घडू शकतील. आम्ही ते खपवून घेणार नाही, अशा शब्दात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी पद्मावत  या  चित्रपटाबाबत सध्या सुरू असलेल्या वादाबाबत भूमिका मांडली. 

विट्यातील 36 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून डॉ. पवार बोलत होते. ते म्हणाले, मराठीतले पहिले साहित्य हे एक  ऐतिहासिक दस्तऐवज  आहे. लीळाचरित्र हे पहिले मराठी भाषेतले साहित्य आहे.  इतिहास आणि साहित्य यांचा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. परंतु काहीवेळा इतिहासाने साहित्याचे विकृतीकरण केल्याचेही  दिसते. संभाजी महाराज यांच्याबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी केवळ इतिहास म्हणून मांडण्यात आल्या. इतिहास हा साहित्याप्रमाणेच सर्वव्यापी असतो. दुष्काळ हा जसा साहित्याचा विषय आहे तसाच तो इतिहासाचाही विषय आहे. 

शिवाजी महाराजांनी केवळ गड, किल्ले बांधले आणि लोकांना स्वातंत्र्य दिले, संरक्षण दिले, असे नाही. त्यांनी मराठी भाषेलाही इतर भाषांच्या जोखडातून मुक्त केले. त्यामुळे ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरच शिवाजी महाराज यांना सुद्धा साहित्य प्रांतात स्थान दिले पाहिजे. ऐतिहासिक साहित्यकाराला नाट्यमयतेचे आकर्षण असते. पण त्यातही सामाजिक  भान सुटू न देणे हे त्यांचे कर्तव्य असते. साहित्यकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरूर घ्यावे. परंतु इतिहासाचे विकृतीकरण  करणे चुकीचे आहे. 

स्वागताध्यक्ष अ‍ॅड. मोहनराव कदम, अविनाश सांगोलेकर यांची भाषणे झाली. रघुराज मेटकरी यांनी आभार मानले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.