Thu, Apr 18, 2019 16:27होमपेज › Sangli › अजातशत्रू  राजकारणी हरपला

अजातशत्रू  राजकारणी हरपला

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:35AMराज्याचे कर्तृत्वसंपन्न नेतृत्व, जिल्ह्याचे लाडके नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांची एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. डॉ.पतंगराव कदम यांनी त्यांच्या कारकीर्दीत जिल्ह्याचे पालकत्व शिरावर घेवून वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याचा सर्वांगिण विकास झाला. सहकाराला बळकटी मिळाली. शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याने गरुडझेप घेतली. जिल्ह्याचा खर्‍या अर्थाने कायापालट झाला. त्यांनी काँग्रेसला चालना दिली. विविध संस्थांचे जाळे मतदार संघात निर्माण केले. सोनहिरा, उद्गिरी हे साखर कारखाने, सागरेश्‍वर, कृष्णा-वेरळा या  सूतगिरण्या त्यांनी स्थापन केल्या.  कडेगाव व पलूस तालुक्यांची निर्मिती ही केवळ डॉ. कदम यांच्यामुळेच झाली. गरिबांच्या मुलांनी शिकावे ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी अशा मुलांच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांची फी माफ केली. असा हा गरीबांचा कैवारी असणारा नेता आता आपल्यात राहिला नाही. त्याच्या जाण्याने सांगली जिल्ह्याचे पालकत्व हरपले आहे. कडेगाव-पलूस मतदारसंघ व जिल्हा पोरका झाला आहे. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारा नेता हरपला आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. 

याला जीवन ऐसे नाव...
यशवंतराव चव्हाण, वसंतदादांच्या विचारांचे खरे वारसदार
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यात  नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती.ती भरून काढण्याचे महत्वाचे काम डॉ. पतंगराव कदम यांनी केले. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा यांच्या विचारांचा खरा वारसा डॉ. कदम यांनी चालविला. अत्यंत तडफदारपणे निर्णय घेतले. ते अंमलातही आणले. 

सर्वांशी दोस्ताना 
डॉ. पतंगराव कदम यांचा सर्वांशी दोस्ताना होता. त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांचे चाहते आणि मित्र होते. राजकारणात त्यांचे सर्वच पक्षाशी चांगले संबध राहिले.  त्यामुळे राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी पतंगराव यांची कामे सहज होत होती.

आई-वडिलांवर प्रेम 
डॉ.कदम यांचे आई-वडिलांवर मोठे प्रेम होते. त्यासाठी त्यांनी आई-वडिलांच्या नावे ट्रस्ट स्थापन केला. त्याद्वारे लोकांना मदत केली.आईच्या नावाने त्यांनी आदर्श माता पुरस्कारही सुरु केला. त्याद्वारे राज्यातील अनेक आदर्श मातांचा गौरव केला.

विकास कामांत सर्वांना मदत 
डॉ. कदम यांनी विकास कामात सवार्ंना मदत केली. तो आपला आहे, की परका याचा विचार कधीच केला नाही. त्यांच्या धोरणामुळेच कडेगाव-पलूस मतदारसंघाचा सर्वांगिण विकास झाला आहे. पलूस व कडेगाव तालुक्यातील विकास कामात त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांनाही मदत केली आहे. वेळप्रसंगी त्यांच्या प्रकल्पांना भेटही दिली. 

मित्र असावा तर असा 
डॉ. कदम यांनी आपल्या मित्रांना नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून राहिलेले मित्र आजही भारती विद्यापीठामध्ये काम  करतात. भारती विद्यापीठ, विविध सहकारी संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांना नेहमीच मदतीचा  हात दिला. 

अनोखे बंधू प्रेम 
डॉ. कदम यांना सात भाऊ आहेत. सर्वच बंधूना त्यांनी प्रेम व पाठबळ देवून त्यांना उभे केले. बंधू प्रेम कसे असावे हे डॉ.कदम यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आमदार मोहनराव कदम यांना ते नेहमीच वडिलांसमान मानत. विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी त्यांनी पुढाकार घेतला.  अथक परिश्रम घेतले.


उत्तुंग अशी राजकीय कारकीर्द 
1968 मध्ये एस.टी. महामंडळाच्या सदस्यपदी निवड. डॉ. कदम यांनी ‘गाव तेथे एसटी’ अशी भूमिका घेऊन गावा-गावात एसटी पोहोचवली. महामंडळात हजारो बेरोजगार युवकांना नोकर्‍या दिल्या.

1980 मध्ये भिलवडी-वांगी मतदारसंघात अपक्ष म्हणून लढविलेल्या निवडणुकीत पोस्टाची 55 मते कमी पडल्याने विजयाची हुलकावणी.

1985 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकाची मते घेऊन विजयी. आमदार होताच विकासकामांचा धडाका.

मतदारसंघातील विकास कामे आणि पक्ष निष्ठा पाहून 1990 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळाले. त्यावेळी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार. 29 जून 1992 रोजी राज्याच्या मंत्रीमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून निवड. शिक्षणमंत्री म्हणून काम करताना धाडसी धोरण आखून शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविली.

1995 व  त्यानंतर 1996 च्या  पोटनिवडणुकीतही  निसटता  पराभव. तरीही भारती विद्यापीठ, साखर कारखाना, सूतगिरण्या, शाळा, महाविद्यालये या माध्यमातून विकासकामांचा धडाका.  

1999 मध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला. या निवडणुकीत डॉ. कदम विजयी झाले. यावेळी त्यांना उद्योग व जलसंधारण खात्याच्या मंत्रीपदाची संधी मिळाली. 1999 ते 2003 या कालावधीत मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव  चर्चेत आले होते.

2004  च्या निवडणुकीत डॉ. कदम यांनी तब्बल  एक लाखांहून अधिक मताधिक्याने  विजय  मिळविला. यावेळीही त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते. यावेळी डॉ. कदम सहकारमंत्री  झाले. अनेक  महत्वपूर्ण  निर्णय घेवून त्यांनी मरगळ आलेल्या सहकार खात्याला नवसंजीवनी दिली. 

2008 मध्ये डॉ. कदम यांना महसूलमंत्री हे महत्वपूर्ण खाते मिळाले. त्यांनी  या खात्याला आपल्या कर्तृत्वाने नवी झळाळी दिली. 

2009 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर डॉ. कदम यांच्याकडे वने, मदत व पुनर्वसन खाते आले. अनेक दमदार निर्णय घेत दुर्लक्षित असलेल्या 
या खात्याला नवा आयाम दिला. 

मोदी लाटेतही गड राखला 
2014  मध्ये संपूर्ण  देश आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली. या लाटेत  डॉ. पतंगराव कदम यांनी आपला  गड कायम राखला. 

असा पालकमंत्री होणे नाही
डॉ. कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अनेक वर्षे सांभाळले. त्यांच्यानंतर अनेकांनी पालकमंत्रीपद भूषविले, पण असे काम कोणालाच जमले नाही.