Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Sangli › भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी

Published On: Jun 28 2018 1:35AM | Last Updated: Jun 27 2018 8:09PMसांगली : प्रतिनिधी

सध्या भाजपची अवस्था तंबूत शिरलेल्या उंटासारखी झाली आहे. उंट तंबूत आणि मालक बाहेर, अशी स्थिती आहे. आयारामांची संख्या अशीच वाढत राहिल्यास पक्षाचे काँग्रेसीकरण झाले म्हणण्यापेक्षा काँग्रेस- राष्ट्रवादीत भाजप विलीन झाला काय, असा प्रश्‍न पडेल, अशी खंत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीपाद आष्टेकर यांनी निवेदनात व्यक्‍त केली आहे.

निवेदन म्हटले आहे की, पक्षवाढीसाठी व सत्तेसाठी नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यावा लागतो, हे आम्ही समजू शकतो  पण जुने निष्ठावंत  बाहेर  आणि  नवे आयाराम आत ही परिस्थिती न समजण्यासारखी आहे. आम्ही हेही समजतो, की आमच्याकडे इलेक्टिव्ह मेरीट नाही. आमच्याकडे निवडणूक लढविण्याइतका पैसा नाही. 

सध्या भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. कोट्यवधींची संपत्ती भाजपकडे आहे. मग निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन निवडणूक  लढविण्यास सहाय्य करण्यास काय हरकत आहे? इलेक्टिव्ह मेरीट राहू दे, ज्या ठिकाणी सिलेक्टिव्ह संधी आहे, तिथेही जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. तिथेही नव्यांचाच भरणा होतो. हे कसले धोरण पक्ष राबवित आहे?

नव्यांना प्रवेश देण्यास कोणाचीच हरकत नाही. परंतु त्यांना दोन-चार वर्षे काम करू दे. पक्षाची ध्येयधोरणे समजावून घेऊ देत. त्यातून ते टिकले तर त्यांना संधी द्यावी. सध्या नवे लोक काँग्रेसचे मतलबी धोरण पक्षात राबविले जात आहे व आपण त्यांना संधी देत आहोत.निष्ठावंत जुन्या लोकांना संधी नाही. त्यांचे प्रशासन ऐकत नाही. कारण त्यांना मोठेपणा किंवा किंमत दिली गेली नाही. वैयक्‍तिक तर  दूरच; परंतु सार्वजनिक हिताची कामे करणेही अवघड झाले आहे. परिणामी जनतेकडून टीका, टोमणे ऐकून घ्यावे लागतात. 

आपल्या पदाधिकारी व मंत्र्यांना या कार्यकर्त्यांशी बोलण्यास देत नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे पहायलाही  वेळ नाही. निवेदन अगर पत्राचे उत्तर देणेही जमत नाही. मात्र नव्या मतलबी नेते आणि कार्यकर्त्यांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांची कामे करण्यासाठी त्यांना वेळ आणि उत्साह आहे.  हे अजून किती दिवस चालणार आहे? पक्षशिस्त म्हणून आम्ही याबाबत जाहीर वाच्यता केली नाही; पण आता सहनशक्‍ती संपली आहे. आता आम्ही सर्वांनी जाहीरपणे बोलण्याचे ठरविले आहे. निष्ठावंतांचे एकत्रीकरण सुरू झाले आहे.

पक्ष उभारणीसाठी व नेत्यांना सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी  बळी दिला आहे.  आता सिंहासनावर बसल्यावर त्यांना खालचे काही दिसेनासे झाले आहे. हे सर्वजण संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक. तरीही हे इतके कृतघ्न कसे झाले? ‘अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा’, हे वचन खरे ठरले आहे.