Thu, Jul 18, 2019 16:33



होमपेज › Sangli › घोषणा, मिरवणुकीने शिवसेनेचेही शक्‍तीप्रदर्शन

घोषणा, मिरवणुकीने शिवसेनेचेही शक्‍तीप्रदर्शन

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 11:39PM



सांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपप्रमाणेच शिवसेनेच्याही इच्छुक उमेदवारांनी  मंगळवारी   जोरदार घोषणाबाजी आणि मिरवणुकीने शक्तीप्रदर्शन केले. इच्छुकांनी  मुलाखती दिल्या. शहरातील 46 जागांसाठी 108 जणांनी पक्षाकडे उमेदवारीची  मागणी केली आहे.दरम्यान पक्षाच्या कुपवाड आणि मिरज शहरातील इच्छुकांच्या मुलाखती  बुधवारी  मिरज येथे होणार आहेत. 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या आहेत. त्याच धर्तीवर शिवसेना इच्छुकांच्या  वसंतदादा मार्केट यार्डमधील वसंतदादा पाटील सभागृहात आज मुलाखती घेण्यात आल्या.  वाद्यांचा गजर करीत आणि  हातात भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांना   बरोबर घेऊन अनेक उमेदवारांनी शहरातून घोषणाबाजी करीत मिरवणूक काढली. मार्केट यार्डातील सभागृह आणि परिसर कार्यकर्त्यांनी गजबजला होता.    पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, सुनिता मोरे, रावसाहेब खोजगे यांनी मुलाखती घेतल्या.  तुम्ही कोणत्या कारणासाठी निवडणूक लढवत आहात, सामाजिक  काम काय आहे, आदी प्रश्‍न विचारण्यात आले.  प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 12, 14 , 8 या ठिकाणी इच्छुकांची संख्या  अधिक होती.

पवार गटाचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन

सोमवारी शिवसेनेच्या कार्यक्रमास  पवार गटातील  कोणीही उपस्थित नव्हते. त्याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी  हा गट शिवसेनेत आलाच नव्हता. केवळ माजी आमदार संभाजी पवार ( आप्पा) आले होते, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे  आज मुलाखतीसाठी नगरसेवक गौतम पवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांच्या गटातील इच्छुकांनी आप्पांच्या नेतृत्वाचा उल्लेख करीत शक्तीप्रदर्शन केले.   

शिवसेनेची पहिली यादी दोन दिवसांत : विभुते

जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, पक्षाकडे इच्छुंकांची अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी आहे. खासदार गजानन किर्तीकर गुरुवारी येथे येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात आमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.