Sun, Mar 24, 2019 16:12होमपेज › Sangli › बेदाणा बाजारपेठेत ‘अच्छे दिन’

बेदाणा बाजारपेठेत ‘अच्छे दिन’

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:36PMतासगाव : प्रमोद चव्हाण

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बेदाण्याला 50 ते 60 रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’  येण्याची चिन्हे दिसत आहेत. हिरव्या बेदाण्याने दोनशेचा आकडा आत्ताच पार केला आहे. पिवळा बेदाणाही उच्चांकी दराने विक्री होत आहे.

तासगाव बाजार समिती ही महाराष्ट्रामध्ये बेदाणा उलाढालासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. देशभरातून अनेक व्यापारी या ठिकाणी बेदाणा खरेदी करण्यासाठी येतात. तसेच सांगली, सोलापूर, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील बेदाणाही येथे विक्रीसाठी आणला जातो.

गेल्या वर्षी देशात बेदाण्याचे एक लाख 60 हजार टन उत्पादन घेण्यात आले होते. यंदा त्यात 20 हजार टनाची घट होऊन 1 लाख 40 हजार टन  उत्पादन झाले आहे. भारतामध्ये तयार होणार्‍या  बेदाण्यापैकी 35 टक्के  निर्यात केला जातो. तब्बल 65 टक्के बेदाणा देशात वापरण्यात येतो. 

तासगावमध्ये रोज 400 ते 450 टन बेदाण्याची आवक होते. यातील 300 ते 350 टन बेदाणा विकला  जातो. तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, कन्याकुमारी, दिल्‍ली, उत्तरप्रदेश, पंजाब, काश्मीर, बिहार, पश्‍चिम बंगाल, गुजरात या राज्यांसह देशभरातून याठिकाणी व्यापारी बेदाणा खरेदीसाठी येत असतात.

इराण, अफगाणिस्तान, चीन या देशांतही बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते. इराणमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये, अफगाणिस्तानात सप्टेंबरमध्ये तर चीनमध्ये एप्रिल - मे या कालावधीमध्ये बेदाणा तयार होतो. जगभरातील बेदाणा उत्पादनावर दराचे गणित ठरत असते. मात्र चव आणि उच्चप्रतीसाठी  सांगली, सोलापूर, विजापूर या जिल्ह्यांतील बेदाण्याला अधिक मागणी आहे. यंदा इराण, अफगाण या देशातील उत्पादन कमी झाल्याने भारतीय बेदाण्याला मागणी वाढली आहे. 

गणेश चतुर्थीनंतर देशभरात वेगवेगळे सण सुरू होतात. त्यामुळे बेदाण्याला आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर 10 ते 15 रुपयांनी वाढणार असल्याचे बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील बेदाण्याला प्रचंड मागणी आहे. यंदा बेदाणा कमी असला तरी शेतकर्‍यांना मात्र चांगला लाभ  होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बाजार समितीमध्ये बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

द्राक्षे टिकवून ठेवण्याचे प्रयत्न : सभापती पाटील

सभापती पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यासह परिसरात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र हा शेतीमाल टिकाऊ नाही. त्यामुळे  अनेकदा शेतकरी येईल त्या दराला द्राक्षे विकून टाकतो. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर द्राक्षे टिकवून ठेवण्यासाठी तासगाव तालुक्यात प्री कुलिंग स्टोअरेज उभारण्याचा मानस आहे. यासाठी अभ्यास  सुरू आहे. यात यश मिळाल्यास तासगावची द्राक्षे वर्षभर देशात उपलब्ध करुन देता येतील.

एक लाख टन बेदाणा साठवण्याची क्षमता

जिल्ह्यात बेदाणा साठवून ठेवण्यासाठी 72 शीतगृहांची व्यवस्था आहे. या शीतगृहांमध्ये एकूण 95 हजारांवर टन बेदाणा साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यापैकी 60 हजारांवर टन बेदाणा हा फक्‍त तासगाव तालुक्यात साठवून ठेवण्याची क्षमता आहे.  या शीतगृहांमध्ये चार महिन्यांपर्यंत द्राक्षेही जशीच्या तशी (गोडीसह) टिकू शकतात.