Wed, Jul 17, 2019 00:44होमपेज › Sangli › सहा हजार कोटींची उलाढाल दलाल भरोसे

सहा हजार कोटींची उलाढाल दलाल भरोसे

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 10:34PMसांगली :­­ उध्दव पाटील

‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ ही उक्ती सर्वश्रुत आहे. समस्यांचे निवारण करण्याऐवजी त्याची सवय लावून घेण्याची वृत्ती त्यातून अधोरेखित होते. द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांची दलाल / खरेदीदार व्यापार्‍यांकडून होणारी फसवणूक हा त्याचाच एक प्रकार आहे. जिल्ह्यातील द्राक्ष विक्रीची सहा हजार कोटींची उलाढाल दलाल भरोसे आहे. कोणत्याच यंत्रणेचे त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना गंडा घातल्यावरच यंत्रणेला जाग येते. हे चित्र नेहमीच पहावयास मिळते. 

जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी आदी तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. दलाल / खरेदीदार प्रथम रोखीने द्राक्षे खरेदी करतात. शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करतात. त्यानंतर द्राक्षे खरेदी करणे व पैसे बुडवणे असे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. बांधावर थेट खरेदीमध्ये दलाल/खरेदीदाराकडून येणारे वजन, सूट, दर यात फसवणूक होते.
 ‘क’ ग्रेड दलाल/व्यापार्‍यांची चौकशी झाली का?

गेल्यावर्षी दलालांकडून शेतकर्‍यांच्या फसवणुकीचा प्रकार घडल्यानंतर जानेवारी 2017 मध्ये  तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. पोलिस, सांगली व तासगाव बाजार समिती, द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी, काही द्राक्ष बागायतदार शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी द्राक्ष  विक्रीकरण्यापूर्वी दलाल/व्यापार्‍यांकडील ओळखपत्र, आधारकार्डाची नोंद घ्यावी. द्राक्ष बागायतदार संघाने मागील दहा वर्षातील चांगल्या व्यापार्‍यांची नावे व फोटो घेऊन त्यांची ग्रेडनुसार फोटोसह यादी करावी. सलग दहा वर्षे योग्य रितीने व्यापार करणारे ‘अ’ ग्रेडमध्ये, पाच वर्षाचे व्यापारी ‘ब’ ग्रेडमध्ये, 1 ते 3 वर्षातील व्यापारी ‘क’ ग्रेडमध्ये अशी यादी तयार करून बाजार समिती व द्राक्षबागायतदार संघाने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी. ‘क’ गे्रडमधील दलाल/व्यापार्‍यांशी रोखीनेच व्यवहार करावेत अन्यथा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. द्राक्ष बागायतदार संघ व बाजार समितीने ‘सी’ ग्रेड दलाल/व्यापारी यांची फोटोसह यादी करून पोलिस यंत्रणेकडे चौकशीसाठी सादर करावी. या यादीतील दलाल/व्यापार्‍यांची चौकशी करून पोलिस यंत्रणेने ब्लॅकलिस्ट तयार करून प्रसिद्ध करावी, अशी सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिली होती. मात्र या सर्व सुचनांचे पालन झाले नसल्याचेच दिसत आहे. 

ओळखपत्रासाठी महसूल, पोलिस यंत्रणेचा पुढाकार महत्त्वाचा : सभापती दिनकर पाटील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले, द्राक्ष हा शेतीमाल बाजार समिती कायद्यातून नियमनमुक्त केलेला आहे. त्यामुळे नियंत्रण आणण्यास बाजार समितीला मर्यादा आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक टाळणे अतिशय आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस, डीडीआर ऑफीस यांचा पुढाकार आवश्यक आहे. बाजार समितीकडून शासकीय यंत्रणेला सर्व सहकार्य मिळेल. द्राक्ष दलालांना ओळखपत्र बंधनकारक करणे व कायद्याचा धाक दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. 

दलालांना नोंदणी आवश्यक; फसव्यांना ‘स्वाभिमानी’ फोडून काढणार : महेश खराडे 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे म्हणाले, फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी द्राक्ष दलालांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी आवश्यक आहे. दलालांना ओळखपत्र द्यावे. त्यापूर्वी त्यांच्या मूळ ठिकाणाची पोलिस यंत्रणेने शहानिशा करावी. बाजार समितीने ओळखपत्र देताना दलालांकडून पाच ते दहा लाख रुपये अनामत घ्यावी. या अनामत रकमेचा डी.डी. घ्यावा. स्वाभिमानी शेतकरी संघटना दलालांचे ओळखपत्र /आधारकार्ड चेक करणार आहे. फसव्यांना फोडून काढणार आहोत.