Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Sangli › परवान्यापेक्षा जास्त खते, बियाणे जप्त करा

परवान्यापेक्षा जास्त खते, बियाणे जप्त करा

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:02PMसांगली : प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना  बियाणे, खते यांचा पुरेसा  साठा  उपलब्ध करून द्यावा.   फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणांनी दक्ष राहून  अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशके यांचा साठा जप्त करून संबधीतांवर गुन्हे  दाखल करा, असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले. 

कृषी, फलोत्पादन, आणि पणन  विभाग यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री  खोत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील,  आमदार विलासराव जगताप,  जिल्हा कृषी अधीक्षक  राजेंद्र साबळे, अग्रणी बँकेचे लक्ष्मीकांत कट्टी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हापरिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि  उपस्थित होते.

दरम्यान खोत यांनी द्राक्षे पिकास वर्षभर विमा संरक्षण मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले.  मंत्री  खोत म्हणाले,  पेरणी हंगामात लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागातील शिपायापासून अधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा.   त्यांना मार्गदर्शन करावे.   कृषि यांत्रिकीकरणासाठी गतवर्षी जिल्ह्याला 16 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या तुलनेत यावर्षी दीडपट निधी अधिक उपलब्ध करून दिला जाईल. त्या दृष्टीने कामांना पूर्वसंमती द्यावी.  ते म्हणाले, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 8 हजार 326 लोकांना 18 कोटी 67 लाख रूपयांचे अनुदान आदा करण्यात आले आहे. उर्वरित 4 हजार 600 प्रस्तावांसाठीही 15 दिवसात अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.  13 कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषि विभागाला 2 लाख 40 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा.  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,  समृध्द जनकल्याण योजना, विविध विस्तार योजना, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन विकास, कृषि विभागातील जिल्ह्यातील  रिक्त पदे आदि विषयांचा सविस्तर आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, पीक कर्ज वितरणामध्ये जिल्ह्यात सुमारे 2100 कोटींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत 34 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्या बँकांनी पीक कर्ज वितरणामध्ये समाधानकारक कामगिरी केली नाही, त्यांची बैठक घेऊन 24 जूनपर्यंत उद्दिष्ट पूर्तीचे आदेश दिले आहेत. पीक कर्ज वितरणामध्ये   जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर असून उद्दिष्ट पूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.  स्वातंत्र्यसेनानी  क्रांतीवीर पांडू मास्तर यांचे स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त  रेठरे धरण ( ता. वाळवा) येथे समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या  कामांचा आढावा घेण्यात आला.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मातोश्री सरोजिनी देशमुख यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

बोगस पपई बियाणावरून अधिकारी धारेवर

पपई बियाणे बोगस असल्याने गेल्या वर्षी काही शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्याबाबत काय कारवाई केली, याची विचारणा मंत्री खोत यांनी केली. मात्र अधिकार्‍यांना  समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे अधिकार्‍यांना धारेवर धरत संबंधीत दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी  दिले. 

शेती कर्जाचे टार्गेट पूर्ण न करणार्‍या बँकांवर कारवाई

बैठकीत  बँकाकडून पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला.  उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी स्वतंत्र काऊंटर सुरू करावेत.  शेती कर्जाचे ज्या बँका टार्गेट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.   एसएलबीसी आणि आरबीआय यांना कळविण्यात येईल,   असे मंत्री खोत आणि जिल्हाधिकारी पाटील यांनी   स्पष्ट केले.