Fri, Jul 19, 2019 22:15होमपेज › Sangli › विज्ञान, तंत्रज्ञानच जगाचे तारणहार : गणपती यादव

विज्ञान, तंत्रज्ञानच जगाचे तारणहार : गणपती यादव

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 11:34PMसांगली : प्रतिनिधी

भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी मानव प्रयत्न करीत आहे. त्याला चांगले शिक्षण मदत करेल. प्रगतीसाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीच जगाला तारू शकेल, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक आणि मुंबईतील  इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे  कुलगुरू पद्मश्री डॉ. गणपती यादव यांनी केले. मराठा समाज संस्थेच्यावतीने डॉ. यादव यांचा शनिवारी येथे  गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. यादव यांचे ‘उद्याचे जग’ या विषयावर  व्याख्यान झाले. 

ते  म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भोवतालचे जग आणि आरोग्य बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपल्या देशात अजूनही धर्माच्या नावाखाली घाण पाण्याच्या नदीत अंघोळ केली जाते. झोपडपट्ट्या आहेत. वाहतूक व्यवस्था नाही. त्यात लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. 

डॉ. यादव म्हणाले,  आता सायबर फिजिक्स येत आहे. त्यातून स्मार्टसिटीची कल्पना पुढे आलेली आहे. स्मार्टसिटीसाठी इंटरनेट  महत्त्वाचे झालेले आहे. एका बोटावर जग आहे. यातून अनेक प्रश्‍न सुटू शकतील. डिजिटलचा वापर करून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचणार आहोत. स्मार्टसिटी, स्मार्ट कार असेल. या सर्व तंत्रज्ञानाचा फायदा हा मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी होणार आहे. 

ते म्हणाले, भविष्यात मेंदूही प्रयोगशाळेत बनवता येईल. स्टेम सेलमुळे आजारावर मात करणे शक्य झाले आहे. कुंडली बघण्याऐवजी मानवी जिनोम काढला तर आपल्याला कधी कोणता आजार होणार आहे, याची माहिती मिळेल.  विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे प्रगती होऊ शकते. कोणतेही तंत्रज्ञान हे वाईट नसते. त्याचा दुरुपयोग हा वाईट असतो.  चांगले शिक्षण घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगतीत राहिल्यास भारतही 2050 पर्यंत सर्वांच्या बरोबरीने असेल, असे ते म्हणाले.  मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी स्वागत केले. प्रा. शशिकांत जाधव यांनी ओळख करून दिली. अशोक सावंत यांनी आभार मानले. उपाध्यक्ष संभाजीराव पाटील-सावर्डेकर, खजिनदार ए. डी. पाटील, सरचिटणीस सुधीर सावंत आदी उपस्थित होते.