Sun, Nov 18, 2018 12:11



होमपेज › Sangli › स्कूल व्हॅन दुचाकीला धडकून ४ ठार

स्कूल व्हॅन दुचाकीला धडकून ४ ठार

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:49PM



संबरगी : प्रतिनिधी 

अथणी-विजापूर राज्यमार्गावर ऐगळी क्रॉसवर स्कूल व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले, तर 25 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकीवरील तिघे आणि व्हॅनचालकाचा समावेश आहे. 

अप्पासाहेब संबू मराठी (वय 40), मनोज दोडमनी (32), धानाप्पा मगदूम (38, सर्व रा. यलहडगी) आणि व्हॅनचालक सिद्धगिरी सिद्धाप्पा पुजारी (30, रा. आर्टाळ, ता. अथणी) अशी मृतांची नावे आहेत. तिघे मृत आरकेरी (जि. विजापूर) येथून देवदर्शन घेऊन यलहडगीला परतत होते. त्यांना धडक देऊन क्रूझर व्हॅन त्यांच्यावरच उलटली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थी माणिकप्रभू कन्‍नड प्राथमिक शाळेत शिकतात. त्यांच्यावर अथणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देसाईवाडी येथून माणिकप्रभू शाळेला रोज 25 मुले क्रूझरमधून जातात. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर दुचाकीला धडकून उलटली. क्रूझरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते. 

सागर ठक्‍कानावर, आकाश ठक्‍कनावर, विकास माने, नेहाल माने, प्रभू हालेळी, संपत जगताप (वय 65) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना मिरज येथील शासकीय व खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आलेे. 25 विद्यार्थी किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर अथणी शासकीय दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही विद्यार्थी सायंकाळपर्यंत बेशुद्ध होते.तालुका आरोग्याधिकाऱयांचे पथक उपचार करत आहे. घटनास्थळी ऐगळी पोलिस, अथणी पोलिसांनी दाखल होऊन  जखमींना हलवले.

अथणी तालुक्यात 2005 मध्ये केएसआरटीसी बस पार्थनहळ्ळी येथे विहिरीत कोसळून 35 जणांना जलसमाधी मिळाली होती. अपघाताविषयी गटशिक्षणाधिकारी एम.वाय.व्हनकस्तुरी यांच्याशी संपर्क साधला असता सदर शाळा खासगी विनाअनुदानित असल्याने  नियमानुसार चौकशी करून कारवाई करण्यात येणार येईल, असे त्यांनी सांगितले.  माणिकप्रभू संस्था चेअरमन सी.एच.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता  विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च संस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिकोडी भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चिदानंद सवदी यानी रूग्णांची विचारपूस केली.

संस्थाचालकावर गुन्हा

ऐगळी पोलिसांनी शिक्षणसंस्थेचे चेअरमन सी. एच. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक तसेच मृत क्रूझर चालक अश तिघांवर निष्काळजीपणे वाहन चालवणे, मृत्यूला कारणीभूत ठरणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.