Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Sangli › शाळांच्या राष्ट्रीय चाचणीत जिल्हा पिछाडीवर

शाळांच्या राष्ट्रीय चाचणीत जिल्हा पिछाडीवर

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 8:36PMसांगली : उध्दव पाटील

शालेय गुणवत्तेची पातळी तपासण्यासाठी देशात निवडक खासगी अनुदानित, जिल्हा परिषद व पालिका शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीतील निवडक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी झाली. या चाचणीचा निकाल सांगली जिल्ह्यासाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरत आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात सांगलीचा क्रमांक विषयनिहाय अकरावा, पंधरावा ते पंचविसावा आहे. नंदूरबार, गडचिरोली, बीड, वाशिम, हिंगोलीसारखे जिल्हेही सांगलीच्या पुढे आहेत. जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता पुन्हा ऐरणीवर आली आहे. 

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्या वतीने दि. 13 नोव्हेंबर रोजी तिसरी, पाचवी व आठवीमधील निवडक शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेतली होती.

जिल्ह्यातील 173 शाळा

‘एनसीईआरटी’ ने ‘यु-डायस’वरील माहितीवरून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीसाठी शाळा, विद्यार्थी व विषयांची निवड केली होती. सांगली जिल्ह्यातून 173 शाळा निवडल्या होत्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, कन्नड, उर्दू माध्यमाच्या खासगी अनुदानित, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळांचा समावेश होता. तिसरीच्या 61, पाचवीच्या 61 आणि आठवीच्या 51 शाळांचा समावेश होता. या परीक्षेसाठी एनसीईआरटी/महाराष्ट्र विद्या प्राधिकरणने प्रश्‍नपत्रिका काढली होती. संबंधित शाळेतील शिक्षकांमार्फत परीक्षा न घेता डी.एड्., बी. एड्. विद्यालयांच्या  विद्यार्थ्यांमार्फत घेतली होती. 

तिसरीसाठी भाषा, गणित आणि परिसर अभ्यास या तीन विषयांवर प्रत्येकी 15 प्रश्‍न होते. एकूण 45 प्रश्‍नांसाठी 90 गुणांची परीक्षा होती. आठवीसाठी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या चार विषयांवर प्रत्येकी 15 प्रश्‍न होते.  एकूण 60 प्रश्‍नांसाठी 120 गुण होते. या परीक्षेचा निकाल समोर येताच आश्‍चर्य आणि गांभीर्यही व्यक्त होत आहे. 

सांगली ‘अ‍ॅव्हरेज’; रत्नागिरी, सिंधूदूर्ग, सातारा, कोल्हापूर पुढे

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी परीक्षेत सांगली जिल्हा  ‘अ‍ॅव्हरेज’ ठरला आहे. राज्याच्या निकालाची सरासरी ही सांगली जिल्ह्याच्या निकाला एवढी दिसत आहे. तिसरीच्या संपादणूक सर्वेक्षण परीक्षेत सिंधूदूर्ग जिल्हा ‘नंबर वन’ ठरला आहे. रत्नागिरी द्वितीय आहे. सातारा, अहमदनगर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, वाशिम, रायगड, गडचिरोली, नांदेड, लातूर हे जिल्हे सांगलीच्या पुढे आहेत. पाचवीच्या परीक्षेत रत्नागिरी प्रथम, सिंधुदूर्ग द्वितीय आहे. धुळे, बीड, सातारा, नंदूरबार, वाशिम, उस्मानाबाद, सोलापूर बुलढाणा हे जिल्हे सांगलीच्या पुढे आहेत. आठवीच्या परीक्षेत बीड प्रथम आहे. सिंधुदूर्ग, नंदूरबार, हिंगोली, बुलढाणा, सोलापूर, गडचिरोली, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक हे जिल्हे सांगली जिल्ह्याच्या पुढे आहेत. 

देशाच्या शालेय गुणवत्तेची चाचणी झाली आहे. राज्यात सांगली जिल्ह्याचे स्थान पिछाडीवर आहे. जिल्ह्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता त्यातून प्रतिबिंबित होत आहे.