Thu, Jun 27, 2019 13:53होमपेज › Sangli › ‘सिव्हिल’मध्ये रेबीज लसीचा तुटवडा

‘सिव्हिल’मध्ये रेबीज लसीचा तुटवडा

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 8:55PMसांगली : अभिजित बसुगडे

कुत्रे चावल्यानंतर 72 तासांच्या आत देण्यात येणार्‍या एआरएस (अँटी रेबीज सिरम) लस सांगलीच्या सिव्हिलमध्ये उपलब्ध आहे.  मात्र त्यानंतर देण्यात येणार्‍या रेबीज लसीचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना नाहक भूर्दंड सोसावा लागत आहे.  शासनाच्या नव्या निमयमामुळे पिवळे रेशनकार्ड नसलेल्या रुग्णांना सरळ-सरळ ती लस बाहेरून आणण्याचा सल्ला सिव्हिलमध्ये दिला जात आहे. एआरएस लस जिल्ह्यात फक्त सिव्हिलमध्येच दिली जाते. ती उपलब्ध आहे. मात्र रेबीजचा तुटवडा असल्याने आता त्याचा भार रुग्णांवर पडत आहे.  

कुत्रे चावल्यानंतर रेबीजचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तब्बल वीस वर्षाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचेही एक उदाहरण आहे. त्यामुळे श्‍वानदंश झाल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित रुग्णाला एआरएस लस देणे हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही कुत्रे चावल्याची घटना घडल्यानंतर रुग्णाला सांगलीच्या सिव्हिलमध्ये पाठविले जाते. तेथे रुग्णाला दाखल करून घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवून एआरएस लस रुग्णाला दिली जाते. त्यानंतर ठराविक 
कालावधीनंतर रेबीजच्या लसीचे डोस दिले जातात. 

पूर्वी एआरएस लस दिल्यानंतर रेबीजचा एक डोस सिव्हिलमध्येच दिला जात होता. त्यानंतर मात्र रुग्ण ज्या परिसरातील तेथील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयात पुढील डोस घेणे आवश्यक आहे. मात्र सध्या कुत्रे चावल्यानंतर पहिल्यांदाच देण्यात येणारी एआरएस लस सिव्हिलमध्ये उपलब्ध आहे. मात्र त्यानंतरचा रेबीजचा डोस लस अल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने दिला जात नाही. त्याशिवाय शासनाने दिलेल्या निर्देशामुळे गेल्या महिन्याभरापासून फक्त पिवळे रेशनकार्ड असलेल्या रुग्णांना ती लस दिली जात आहे. अन्य रुग्णांना मात्र सरळ-सरळ बाहेरून लस विकत आणण्याचा सल्ला सिव्हिलमधील डॉक्टरांकडून दिला जात आहे. 

सिव्हिलमध्ये येणारे रुग्ण सामान्य, गरीब असतात. त्यामुळे अशा रुग्णांना साडेतीनशे रुपयांची लस विकत आणण्यास सांगितले जाते, यामुळे  रुग्णांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.