Wed, Jun 26, 2019 18:10होमपेज › Sangli › बनावट नोटा प्रकरणी सातारच्या तरुणास अटक

बनावट नोटा प्रकरणी सातारच्या तरुणास अटक

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:35AMसांगली/सातारा : प्रतिनिधी

सांगली पोलिसांनी मंगळवारी बनावट नोटाप्रकरणी एकाला मिरज येथे अटक केल्यानंतर त्या नोटा सातार्‍यातील एका युवकाने दिल्या  असल्याचे कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा व सांगली पोलिसांची बुधवारी याप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त असून, 2000 व 500 रुपयाच्या बनावट नोटा सातार्‍यात छापल्या जात आहेत का?, नोटा छापणार्‍या टोळीमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे?, आर्थिक व्यवस्था खिळखिळी करणार्‍यांनी बाजारात किती नोटा वितरित केल्या आहेत? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारी सांगली पोलिसांनी मिरज येथून गौस गब्बार मोमीन (वय 21, रा. मिरज) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 2 हजार रुपयाच्या चार नोटा, तर 500 रुपयाच्या सतरा अशा एकूण 21 बनावट नोटा सापडल्या. चलनी नोटांप्रमाणे दिसणार्‍या त्या नोटा बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सांगली पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. संशयित गौस मोमीन याच्याकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने या नोटा शुभम खामकर (रा. एमआयडीसी, सातारा) या युवकाकडून घेतल्या असल्याची कबुली दिली.

2000 व 500 रुपयाच्या सापडलेल्या बनावट नोटा सातार्‍यातील युवकाने दिल्याचे समोर आल्यानंतर सांगली पोलिसांनी आपला मोर्चा सातार्‍याकडे वळवत कारवाईचा फास आणखी आवळला. संशयित गौस व शुभम या दोघांवर बनावट नोटाप्रकरणी सांगली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. बनावट नोटाप्रकरणी सातार्‍यातील युवकाचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस दलातही खळबळ उडाली. बुधवारी सकाळपासून शुभम खामकर या युवकाची माहिती घेवून त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार बनावट नोटाच्या लिंकप्रकरणी सातारा पोलिसांनी काही संशयितांची उचलबांगडी केलेली आहे. रात्री उशीरापर्यंत या कारवाईबाबत पोलिसांकडून गोपनियता बाळगण्यात आली होती. बनावट नोटाप्रकरणी महत्वाचे धागेदोर हाती लागल्यानंतर सातारा पोलिसांनी कारवाई तीव्र केली. 

बनावट नोटांच्या प्रकरणामुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यामध्ये बनावट नोटा सातार्‍यातील युवकाने दिल्याने त्या नोटा सातार्‍यात छापल्या गेल्या आहेत का? नोटा छापण्यासाठी कोणते मशीन वापरले गेले आहे? बनावट नोटा छापण्याची नेमकी पध्दत कोणती व कशी आहे? या टोळीमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे? टोळीकडून आतापर्यंत किती बनावट नोटा छापल्या गेल्या आहेत? बाजारात किती नोटांचे वितरण झालेले आहे? सातारा, सांगलीसह आणखी कोणत्या जिल्ह्यात बनावट नोटा वितरीत झाल्या आहेत का?असे अनेक सवाल उपस्थित झाले असून पोलिस या साखळीचा पर्दाफाश करणार का? याकडे लक्ष लागले आहे.