Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Sangli › उपसरपंच निवडीत सरपंचांना मताचा अधिकार

उपसरपंच निवडीत सरपंचांना मताचा अधिकार

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 16 2018 11:57PMसांगली/ विटा प्रतिनिधी

उपसरपंच निवडणुकीत सरपंच यांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसर्‍या व निर्णायक मताचा वापर करता येईल, असा निर्णय उच्च न्यायालयालाचे न्यायमुर्ती रणजित मोरे, न्यायमुर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव व शिंदेवाडी (घो.) येथील सरपंचांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय झाल्याची माहिती खानापूरचे माजी सभापती अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली. 

ढालगावच्या सरपंच मनीषा जनार्दन देसाई व शिंदेवाडीच्या (घोरपडी) सरपंच आक्काताई गणपत भोसले यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती करून सरपंच यांची थेट निवड करण्याचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार कलम 30 अ -1 अ अन्वये निवडून आलेला सरपंच हाा पदसिद्ध सदस्य असेल आणि कलम 33 पोट कलम 6 (4) अन्वये उपसरपंचांच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा हक्क असेल अशी तरतूद आहे. 

या तरतुदीच्या अनुषंगाने उपसरपंच यांच्या निवडणुकीत सरपंच यांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसर्‍या व निर्णायक मताचा वापर करता येईल किंवा कसे याबाबत शासनाकडे विविध ठिकाणाहून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. शासनाने दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी मागदर्शन पाठविले होते. उपसरपंच निवडणुकीच्या फेरीमध्ये सरपंच यांना मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र या फेरीतील उपसरपंचाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यासच सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असे मार्गदर्शन ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले होते. या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने दि. 1 नोव्हेंबर 2017 चे हे परिपत्रक रद्द ठरविले आहे.सरपंचांना उपसरपंच निवडणुकीत  सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे,  अशी माहिती अ‍ॅड. मुळीक यांनी दिली.