Wed, Feb 20, 2019 00:40होमपेज › Sangli › सराफी दुकान फोडून 25 लाखांचे दागिने लंपास

सराफी दुकान फोडून 25 लाखांचे दागिने लंपास

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 11:22PMजत : प्रतिनिधी

शहरात मध्यवर्ती ठिकाणी (नगरपालिकेलगत) असलेल्या श्री विजय ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून  चोरट्यांनी रविवारी रात्री मुद्देमालावर डल्‍ला मारला. दुकानातील 24 लाख 47 हजार रुपयांच्या सोने व चांदीच्या दागिन्यांची लूट केली. दुकानातील  सर्व दागिन्यांची लूट झाल्याने सराफ सुनील कदम यांना फार मोठा फटका बसला आहे. या चोरीमुळे  शहरात खळबळ उडाली आहे. 

सुनील कदम अनेक वर्षांपासून  सराफी व्यवसाय करतात. नागपंचमीचा सण जवळ आल्याने त्यांनी सोन्या, चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. रविवारी रात्री दुकान बंद करून ते  घरी गेले होते.सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिरायला गेलेल्या  नागरिकांना चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकानाचा बाहेरचा लाकडी आणि आतील बाजूचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा अशा

दोन्ही दरवाजांची कुलूपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.  तिजोरी फोडली. त्यामधील 465 तोळ्यांचे  सोन्याचे तयार दागिने तसेच 27 किलो चांदी आणि  दागिन्यांवर चोरट्यांनी डल्‍ला मारला. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत 24 लाख 47 हजार रूपये होते.

पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली.  श्‍वान पथकातील बिल्‍लू या श्‍वानाने कापड पेठ ते लोखंडी पुलापर्यंत माग काढला. लोखंडी पुलाजवळ चार चाकी वाहनाच्या टायरच्या खुणा आढळल्या. श्‍वान त्याठिकाणी जाऊन घुटमळले. चोरट्यांनी चोरीसाठी चारचाकी वाहनांचा वापर केला असावा. त्यामुळे या चोरीत अनेकांंचा  सहभाग असाव असा पोलिसांचा अंदाज आहे.

कापडपेठ  शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. यापूर्वी या पेठेत अनेकदा चोर्‍या झाल्या आहेत. मात्र कदम यांच्या सराफी दुकानातील चोरी ही सर्वात मोठी  आहे. कदम यांनी या दागिन्यांत मोठी गुंतवणूक केली होती. सर्वच भांडवल गेल्याने आपला व्यवसाय उध्वस्त झाला, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली.शहरात चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. विशेषत: दुकानांना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. महिन्यापूर्वी दरोडेखोरांची एक टोळी पोलिस व नागरिकांनी पकडली  होती. त्यानंतर काही प्रमाणात चोर्‍यांना आळा बसला होता. मात्र चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान आहे.