Sun, Mar 24, 2019 12:30होमपेज › Sangli › संख बलात्कार; आरोपीला फाशीसाठी प्रयत्न : आठवले

संख बलात्कार; आरोपीला फाशीसाठी प्रयत्न : आठवले

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:08AMजत : प्रतिनिधी  

संख (ता. जत) गावात पीडित  मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणारी घटना निंदनीय आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, यात आणखी काहींचा समावेश असेल, त्याला अटक केली जाईल. मात्र, मुख्य आरोपीने केलेले कृत्य माफ करण्यासारखे नाही. त्याला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्‍वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिले. 

ना. आठवले हे रविवारी जत तालुक्याच्या दौर्‍यावर होते. संख येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना चार लाख बारा हजार पाचशे रूपयांची शासकीय मदत आठवले यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जतचे आमदार विलासराव जगताप, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, आर. बी. पाटील, भाऊसाहेब पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, संजय मल्लाप्पा कांबळे, प्रशांत ऐदाळे, भुपेंद्र कांबळे, नानासाहेब वाघमारे उपस्थित होते. 

ना. आठवले म्हणाले, भारतात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. याला माणसाच्या प्रवृत्ती कारणीभूत आहेत. आता जग बदलत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे. घटना घडतात मात्र ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी शिवकालीन दंडनितीचा अवलंब करावा लागेल. यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकले पाहिजे. 

आमच्या खात्यामार्फत आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातूनच संवर्ण व दलित याची दरी कमी करता येईल. यासाठी खास अनुदान ही आपण देऊ केले आहे. ते पुढे म्हणाले, पोलिस योग्य दिशेने तपास करीत असून यातील आणखी काही आरोपी असतील त्यांना अटक केली जाईल. सहा महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.