Thu, Jul 18, 2019 04:45होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेत चुकीला थारा नाही

जिल्हा परिषदेत चुकीला थारा नाही

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:30PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत कोणत्याही चुकीला थारा दिला जात नाही. त्यामुळे कारभारात सुधारणा झालेली आहे. आमदार, खासदारांनीही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. चांगल्या कामाच्या जोरावर ‘डीपीसी’मध्येही जिल्हा परिषदेने विश्‍वासार्हता निर्माण केली आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. 

जिल्हा परिषद अभियंता संघटना व जिल्हा परिषद अभियंता क्रेडीट सोसायटीच्या दैनंदिनीचे प्रकाशन संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. अभियंता संघटनेचे नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अरूण खरमाटे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, कार्यकारी अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता एस. ए. बारटक्के, कार्यकारी अभियंता एस. बी. गायकवाड  प्रमुख उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, आर. आर. पाटील, संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक, अनिलराव बाबर, मोहनराव कदम यांच्यासह नेत्यांनी पंचायतराज व्यवस्थेत अतिशय चांगले काम केले आहे. त्याला डाग लागू नये याची दक्षता घेऊन काम केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासातून जनतेला दिलासा देण्याचे काम केले जात आहे. कर्मचार्‍यांचे प्रश्‍नही मार्गी लावले आहेत. उमराणी (ता. जत) येथे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे देशमुख यांनी महाडिक यांच्या मागणीवर सांगितले. 

पंचायतराज समिती मापे काढण्यापुरती

विजयसिंह महाडिक म्हणाले, जिल्हा परिषदांना सक्षम केल्याचे सांगितले जाते. पण जिल्हा परिषदेला शासनाची समांतर यंत्रणा कार्यरत आहे. या समांतर यंत्रणेलाच शासनाकडून बळ दिले जाते. पंचायतराज समितीचे त्याकडे लक्ष नाही. केवळ मापे काढण्याचे काम ही समिती करते. जिल्हा परिषदेत गैरकाम करणार्‍या अधिकार्‍यांची बदली करावी. प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांकडील कर्मचार्‍यांना वेळेत पगार मिळावा, तीन वर्षावरील कर्मचार्‍यांचे टेबल बदलावे, अशी मागणीही महाडिक यांनी केली.  

प्रास्ताविक अभियंता पतसंस्थेचे अध्यक्ष एन. पी. कोरे यांनी केले. आभार एस. एस. कांबळे यांनी मानले. संघटनेचे अध्यक्ष डी. डी. कांबळे, उपाध्यक्ष एन. आर. मुजावर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष एम. व्ही. सूर्यवंशी, उपअभियंता ए. एस. फरास, प्रवीण तेली, आनंदराव जोशी, उपकार्यकारी अभियंता संभाजीराव जाधव व अभियंते उपस्थित होते.