Thu, Jan 17, 2019 03:53होमपेज › Sangli › भाजपतर्फे संग्रामसिंह देशमुख

भाजपतर्फे संग्रामसिंह देशमुख

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:29AMसांगली/ कडेगाव : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याचा बुधवारी भाजपने  निर्णय घेतला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना दूरध्वनीवरून आदेश दिले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मैदानात उतरविण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.  त्यानुसार गुरुवारी सकाळी 10.30 वाजता अर्ज दाखल करणार आहोत. त्यामुळे काँग्रेसतर्फे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम विरुद्ध जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह  देशमुख अशी दुरंगी लढत होईल,  हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी डॉ. कदम यांचे पुत्र डॉ. विश्‍वजित यांनी शक्‍तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ही पोटनिवडणूक  बिनविरोध करावी, असे  काँगे्रस नेत्यांनी आवाहन केले होते. परंतु, या मतदारसंघातील काँग्रेसचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देशमुख आणि भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. पृथ्वीराज देशमुख यांनीही  पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. यासंदर्भातील प्रस्ताव भाजप प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला होता. 

दरम्यान, मंगळवारीच  भाजप नेत्यांनी अर्ज भरण्याबाबत तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु कोणाचा अर्ज भरायचा याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठीं देतील , असे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस आणि श्री. दानवे यांनी  ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यास सांगितले. देशमुख म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी संग्रामसिंह  यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचा अर्ज गुरुवारी सकाळी 10.30 वाजता  दाखल करणार आहोत. ते म्हणाले,  संग्रामसिंह  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी करीत आहेत. मतदारसंघातही आमची मजबूत बांधणी आहे.  आम्ही ताकदीने  लढणार आहोत. येथेही परिवर्तन दिसून येईल. 

पृथ्वीराज देशमुख भरणार डमी अर्ज

देशमुख म्हणाले, संग्रामसिंह यांच्या नावावर श्री. फडणवीस यांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. त्यानुसार आम्ही गुरुवारी शक्‍तिप्रदर्शनाने त्यांचा उमेदवारी अर्ज भरू. लढत तुल्यबळ होणार, हे स्पष्ट आहे. मला डमी अर्ज भरण्याच्या सूचन दिल्या आहेत. त्यानुसार मीसुद्धा अर्ज भरणार आहे.