Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Sangli › माणिकवाडीतील प्रयोग : उच्चशिक्षित शेतकर्‍याची करामत

डोंगरी टापूत सेंद्रिय हापूस, केशर

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 8:09PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

काही वर्षांपूर्वी ‘हापूस’ हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता. शेतकरी कष्टाने शेती दर्जेदार पिकवितो, पण मार्केटिंगमध्ये कमी पडतो, यासाठी त्याने मार्केटिंगसाठी देखील काम केले पाहिजे, असे या चित्रपटात दाखविले आहे. नेमके याचेच प्रत्यंतर माणिकवाडी येथील संग्राम रामचंद्र सावंत यांच्या आंबाशेतीकडे पाहून आल्याखेरीज राहत नाही.

फलोत्पादनात आता रसायनविरहित, सेंद्रिय फळांना वाढती मागणी आहे. याचाच वेध घेत आणि शाश्‍वत शेतीची मनाशी खूणगाठ बांधत  वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथील एका अभियांत्रिकीतील उच्चशिक्षित शेतकर्‍याने आपल्या डोंगराळ शेतजमिनीत सेंद्रिय हापूस आणि केशर आंब्याचे मोठे उत्पादन घेण्यात सातत्य राखले आहे. संग्राम रामचंद्र सावंत यांचा हा शेतीतील ऑफबीट प्रयोग अन्य शेतकर्‍यांसाठी विशेषत: फळबागलागवड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरतो आहे. 

बदलत्या प्रवाहाचे भान

माणिकवाडी हे तसे पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारे गाव. आता हे चित्र बदलले आहे. याच गावात सावंत यांनी डोंगराळ भागात पडीक जमीन विकत घेतली. ती लागवडीखाली आणली. त्यांना शेतीतील बदलते प्रवाह, ग्राहकांचा सेंद्रिय शेती उत्पादनाकडे वाढता कल याचे  भान होते. त्यांनी सन 2007 मध्ये  दहा एकर शेतीत हापूस आंब्याची लागवड केली. दोन वर्षांनी केशर आंबा लावला. दहा मीटर बाय दहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे रोपांची लागवड केली. दहा एकरात दोन्ही टप्प्यात मिळून 650 रोपे लावली. यासाठी पाण्याची सोय ठिबकने केली. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या घरीच 10 ते 12 देशी गाई आहेत. त्यांचे गोमय, गोमूत्र यांचा वापर करुन सावंत यांनी या आंबा लागवडीसाठी सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेत अर्थात झिरो बजेट शेतीची संकल्पना राबविली.  केवळ गोमय, गोमूत्र आणि सेंद्रिय खताचा वापर केला. त्यामुळे आंब्याच्या झाडांना विलक्षण तजेला आल्याचा त्यांना दिसून आले.

जीवामृताचा झाला फायदा..

त्यांनी पाळेकर यांच्या तंत्राने जीवामृत, घनजीवामृत तयार करण्याचे तंत्र अवलंबले. याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. त्यांनी लागवडीनंतर सहा सात वर्षे फळे घेतली नाहीत, मात्र दोन वर्षांपूर्वीपासून त्यांनी आंब्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. गेल्या  दोन- तीन वेळच्या हंगामात प्रत्येकवेळी सरासरी तीन- साडेतीन  मे. टन आंब्याचे त्यांना उत्पादन मिळाले. या हंगामात थोडे उत्पादन घटले आहे. मात्र दर्जा  उत्कृष्ट आहे.

वाढती मागणी...

या ठिकाणी सेंद्रिय शेती आणि रसायनविरहित आंबा पिकत आहे. उत्पादित आंबा हा चवदार, आरोग्यदायी असाच आहे. या आंब्याला  मागणी देखील वाढू लागली आहे. विशेषत: पुणे, मुंबई येथील  ग्राहक हापूस आणि केशर आंब्यांसाठी सातत्याने मागणी करीत आहे.  राज्यशासनाने गेल्या वर्षी उन्हाळ्यात इस्लामपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याचा  आंबा मार्केटिंगसाठी चांगला फायदा झाल्याचा सावंत यांचा अनुभव आहे.

दरम्यान, नैसर्गिक शेतीतून आंबा पीक घेण्यासाठी नैसर्गिक शेती संकल्पनेचे जनक सुभाष पाळेकर, मनोज पाटील, दिगंबर खोजे, विलास सनेर, जावेद इनामदार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे सावंत यांनी यावेळी  आवर्जून सांगितले.वाळवा तालुक्यासारख्या ऊस शेतीत अग्रेसर असलेल्या तालुक्यात सावंत यांनी मोठ्या जिद्दीने हापूस आणि केशर सेंद्रिय आंब्याचे पीक घेऊन शेतीतून शेतकर्‍याला उद्योजक  बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे असे म्हटले तर ते  चुकीचे ठरू नये.