Fri, Jul 19, 2019 18:30होमपेज › Sangli › कर्मचारी भरती, औषध खरेदीचा अहवाल द्या

कर्मचारी भरती, औषध खरेदीचा अहवाल द्या

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 10:25PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या मानधनावरील कर्मचारी भरती, औषध खरेदी तसेच पाणीपुरवठा व विविध विभागांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. याप्रकरणी सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने महापालिकेला पाठविले आहेत. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. 

यासंदर्भात  उद्योग-व्यवसाय सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शहा, सेनेचे तालुकाउपप्रमुुख  अनिल शेट म्हणाले, महापालिकेत कारभारी, प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डाच बनविले आहे. त्यामुळे कामगार भरती, औषध खरेदीसह विविध विभाग हे जणू कुरणच बनले आहे. शहा म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मानधनावरील कर्मचार्‍यांच्या भरतीत अनियमितता आहे. यासंदर्भात यापूर्वीही  नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. अनेक ठिकाणी वयोवृद्ध कामगारांना  कामाला लावले जाते. पुरेसा पगार न देता   काही कारभार्‍यांकडून डल्ला मारला जातो

ते म्हणाले,  औषधे, साहित्य खरेदीतही मोठे घोटाळे झाले आहेत. यासंदर्भात आयुक्‍तांकडे चौकशीसाठी अनेकवेळा तक्रारी केल्या तरीही त्यांनी दखल घेतली नाही. उलट आयुक्‍तांकडून याबाबत पाठराखणच सुरू आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेसमोर यासंदर्भात सखोल चौकशीसाठी धरणे आंदोलन केले.  मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, विभागीय आयुक्‍तांसह अनेकांकडे तक्रारी केल्या होत्या. शेटे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी  सर्वच तक्रारींबाबत आयुक्‍तांनी  चौकशी करून योग्य तो अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत.  त्यासाठी   चौकशी करून यात सहभागी कारभारी,  अधिकार्‍यांकडून   नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी. त्यासाठी आम्ही आग्रही राहू. 
 

 

 

tags : Sangli,news,employees, recruitment,Sangli,municipal corporation, drug, purchase ,scam, report, order,