Wed, Jul 17, 2019 19:00होमपेज › Sangli › यशोधरा सोसायटीच्या 11 संचालकांना दंड

यशोधरा सोसायटीच्या 11 संचालकांना दंड

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

पकड वॉरंटचा आदेश रद्द करण्यासाठी आलेल्या यशोधरा को-अ‍ॅापरेटिव्ह के्रडिट सोसायटीच्या तत्कालीन 11 संचालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड भरण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने आज दिला. दरम्यान, तत्कालीन अध्यक्ष व माजी आमदार दिनकर पाटील  यांच्यासह दोन संचालक आज वॉरंट रद्द करून घेण्यासाठी न्यायालयात हजर नव्हते. आज वॉरंट रद्द करून घेण्यासाठी न्यायालयात आलेले संचालक असे  : तत्कालीन उपाध्यक्ष महाबळेश्‍वर  चौगुले, अरूण यादव, हणमंत  पाटील,   विनायक  फल्ले, शिवाजी यादव, सदाशिव  पाटील, शहाजी पाटील, सौ. शांता  पाटील (सर्व रा. सांगलीवाडी), अब्दुल  भालदार (रा. संजयनगर), मधुकर शंकर पाटील (रा. नेलकंरजी, ता. आटपाडी) यांनी सांगली येथील यशोधरा  सोसायटीमध्ये  चार लाखांची ठेव ठेवली होती.

मुदत संपूनही ठेव परत मिळत नसल्याने पाटील यांनी अ‍ॅड. प्रदीप जाधव यांच्यामार्फत  ग्राहक न्यायालयात संस्थेच्या 11 संचालकाविरूध्द तक्रार केली होती. ठेवीची रक्‍कम, व्याज व भरपाई देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने 2017 मध्ये  दिले होते. मात्र तरीही  रक्‍कम न मिळाल्याने संचालकांना शिक्षा व्हावी, यासाठी पाटील यांनी अर्ज केला होता. त्याच्या सुनावणीसाठी संचालक उपस्थितीत रहात नव्हते. म्हणून न्यायालयाने या संचालकांच्या विरूध्द पकड वॉरंटचा आदेश दिला होता. पोलिसांकडून या आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ होत होती.

म्हणून न्यायालयाने सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली  होती. त्यामुळे आज नऊ संचालक वॉरंट रद्द करून घेण्यासाठी न्यायालयात हजर झाले. प्रत्येकी 5 हजार रुपये दंड भरण्याच्या अटीवर त्यांना सोडून देण्याचे आदेश न्यायाधीश अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील  श्रीकांत कुंभार व वर्षा  शिंदे  यांच्या   ग्राहक न्यायालयाच्या पीठाने आज दिले. या दंडापैकी निम्मी रक्‍कम ठेवीदाराला देण्याचे आदेश  न्यायालयाने  दिले.. 
 

tags : Sangli,news, yashodhara, Co-Opportive, Credit, Society, Director, penalty,