Thu, Jun 27, 2019 16:38होमपेज › Sangli › दुकानदाराकडून 38 लाखांची फसवणूक

दुकानदाराकडून 38 लाखांची फसवणूक

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 1:13AMसांगली : प्रतिनिधी

कामगाराच्या नावे बँकेत बोगस खाते काढून त्यावर परस्पर व्यवहार करून 38 लाखांची फसवणूक केल्याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी मॅजिस्टिक बॅटरी या दुकानाचा मालक जहीर  याकूब  मणेर (रा. शंभर फुटी रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
 याप्रकरणी इस्माईल जबीउल्ला शब्बीर देसाई यांनी फिर्याद दिली आहे.  विश्रामबाग पोलिस ठाण्यात मणेरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

शंभर फुटी रस्त्यावरील मणेर याच्या मॅजिस्टिक बॅटरी दुकानात देसाई दोन हजार रुपये पगारावर काम करीत होते. काम सुरू करताना पगार घेण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागेल, असे मणेर याने त्यांना सांगितले होते. ते कामावर हजर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मार्केट यार्डातील एका खासगी बँकेतील कर्मचारी विवेकानंद जाधव याला मणेर यांनी बोलावून घेतले. त्याने देसाई यांचे मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड व कोर्‍या कागदावर सही घेतली. त्यानंतर तो निघून गेला. मणेर आणि जाधव या दोघांची ओळख होती. इस्माईल यांच्या अज्ञानाचा फायदा घेत दोघांनी संगनमताने देसाई यांचे खाते उघडण्यासाठी विविध कागदांवर सह्या घेतल्या. 

मणेर याने देसाईंच्या मतदान ओळखपत्र व पॅनकार्डचा गैरवापर करीत बँकेत बोगस तीन खाती उघडली आणि त्यांच्या परस्पर या खात्यांवर व्यवहार सुरू केले.  तब्बल 54 लाखांचे व्यवहार त्या खात्यांवर केले. याबद्दल 2016 मध्ये इस्माईल यांना आयकर विभागाची नोटीस आली. तुमच्या खात्यावरून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्याचा 37 लाख 91 हजार 380 इतका आयकर भरावा लागेल,’ असे त्यात नमूद केले होते. त्यानंतर इतकी मोठी रक्कम खात्यावर कशी आली, याचा शोध इस्माईल यांनी घेण्यास सुरूवात केली. सोमवारी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. 

मणेर याने बँकेतील कर्मचार्‍याला हाताशी धरून कागदपत्रांचा गैरवापर करीत ही फसवणूक केल्याची फिर्याद इस्माईल यांनी दिली. त्यानुसार मणेर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक संगीता माने अधिक तपास करीत आहेत. 
 

 

 

tags : Sangli,news,workers,names,bogus, bank, accounts, 38, lakh ,fraud,Yakub, maner, arrested,