Tue, Nov 13, 2018 03:46



होमपेज › Sangli › थंडीचा कडाका आणखी वाढणार

थंडीचा कडाका आणखी वाढणार

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:10AM

बुकमार्क करा





सांगली ः प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पारा 15 अंशापर्यंत घसरल्यामुळे तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान  थंडीत वाढ झाल्याने  पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. याचा भाजीपाला आणि बागायती पिकांना फटका बसण्याचा धोका आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत असून बाजारात लोकरीच्या कपड्यांना मागणी वाढली आहे.

अरबी समुद्रात वादळ आल्याने पंधरा दिवसापूर्वी   तापमानात वाढ झाली होती. बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला. याचा द्राक्षे आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला. वादळ गेल्यानंतर आता तापमानात पुन्हा एकदा घट होत आहे. चार दिवसापूर्वी पहाटेचे किमान तापमान 18 अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर आज ते 15 अंशापर्यंत खाली आले.  तर दिवसाचे कमाल तापमानही कमी होत 30 अंशापर्यंत खाली आले आहे. पुढील आठवड्यात तापमान किमान 13 अंश तर कमाल 28 अंशापर्यंत खाली येईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी चांगलाच वाढणार आहे. 

दरम्यान थंडीमुळे पहाटेच्यावेळी धुके पडत आहे. सकाळी सहाच्या सुमारास धुक्याची चादर पसरल्या सारखे चित्र दिसून येते. थंडी वाढल्याने ठिक-ठिकाणी शेकोट्या पहाण्यास मिळत आहेत.थंंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे खरेदीसाठीही दुकानदारांच्याकडे गर्दी वाढली आहे. धुक्यामुळे पिकांच्यावर दव पडत आहे. याचा काही पिकांना उपयोग होत असला तरी भाजीपाला आणि बागायती पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याचा धोका आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  शेतकर्‍यांनी औषध फवारणीही सुरू केली आहे.