Thu, Apr 25, 2019 08:08होमपेज › Sangli › सांगलीला लवकरच अप्पर तहसील कार्यालय

सांगलीला लवकरच अप्पर तहसील कार्यालय

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 9:53PMमिरज : प्रतिनिधी

मिरज तालुक्याचे विभाजन करून सांगली स्वतंत्र तालुका करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सध्या सांगलीला अप्पर तहसील कार्यालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.

मिरज तालुक्याचे पश्‍चिम आणि पूर्व भागाची भौगोलिक परिस्थितीही वेगवेगळी आहे. पश्‍चिम भाग सदन असून दरवर्षी कृष्णा आणि वारणा नदीच्या पूराच्या पाण्यात बाधीत होणारा भाग आहे. तर मिरजपूर्व भाग दुष्काळी परिस्थितीत आहे. राज्यात भाजप-सेनेची सत्ता आल्यानंतर मोठ्या तालुक्याचे विभाजन करून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या कामाला गती आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न केले आहेत. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आता मिरज-सांगली दरम्यान विजयनगर येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयालगत सर्व शासकीय कार्यालयाची प्रशासकीय इमारतही आहे. या प्रशासकीय कार्यालयमध्ये सांगलीचे अप्पर तहसील कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

मिरज तालुक्यात 7 मंडल असून यापैकी सांगली, बुधगाव व कसबे डिग्रज ही कार्यालये प्रशासकीय व महसुली कामाकरिता सांगली अप्पर तहसील कार्यालयाकडे जोडण्यात येणार आहेत. मिरज तहसील कार्यालयाकडे मिरज, कवलापूर, मालगाव आणि आरग ही चार मंडल कार्यालय पूर्ववत ठेवण्यात येणार आहे. दक्षिण सातारा जिल्ह्यातून स्वतंत्र सांगली जिल्हा करताना राजकीय सोयीसाठी सांगलीला जिल्हा मुख्यालय, जिल्हा परिषद आणि मिरजला प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय, एस.टी.ची जिल्हा कार्यशाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. तूर्त मिरज तालुक्याचे विभाजन करून सांगली स्वतंत्र तालुका करणे शक्य नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय मिरज-सांगली दरम्यान विजयनगर येथे आली आहेत. नजीकच्या काळात महापालिकेचे मुख्यालयही याच परिसरात येणार आहे. यामुळे सांगलीला अप्पर तहसील कार्यालय देण्याचा पर्याय काढण्यात आला आहे. मिरज तालुक्यात पूर्वीपासून तीन विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र येते.

मिरज, सांगली आणि कवठेमहांकाळ सध्या मिरज, सांगली आणि इस्लामपूर मतदार संघाचे कार्यक्षेत्र आहे. मिरज पश्‍चिम भागातील कसबे डिग्रज मंडल मधील गावे इस्लामपूर विधानसभा कार्यक्षेत्रात येतात. तर सांगलीमध्ये सांगली, बुधगाव तर मिरज विधानसभा क्षेत्रात मिरज, कवलापूर, मालगाव आणि आरग या मंडल कार्यालयातील गावे येतात. राजकीय परिस्थितीही मिरज पूर्व आणि पश्‍चिम भागात वेगवेगळी आहे. नियोजित सांगली अप्पर तहसील कार्यालयाकडे सांगली, अंकली, सांगलीवाडी, हरिपूर, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, दुधगाव, मोळा, कुंभाज, माळवाडी, कवठेपिरान, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वानलेसवाडी, बामणोली, कर्नाळ, पद्माळे, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी, माधवनगर या गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे.