होमपेज › Sangli › घाटमाथ्यावर सहा महिन्यात टेंभूचे पाणी : खा.पाटील 

घाटमाथ्यावर सहा महिन्यात टेंभूचे पाणी : खा.पाटील 

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 21 2018 12:05AMसांगली :  प्रतिनिधी

कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावर टेंभू लाभ क्षेत्रातील गावांना सहा महिन्यात टेंभू योजनेचे पाणी पोहोचणार आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. 
22 गावांतील शिष्टमंडळ व पाटबंधारे विभागाची टेंभू योजनेच्या पाण्यासाठी नुकतीच सांगलीत बैठक झाली.  बैठकीला कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शिंदे, बाजार समितीचे उपसभापती तानाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हाक्के, दादासाहेब कोळेकर, हायूम सावणुरकर, लक्ष्मण पाटील यांच्यासह घाटनांद्रे, तिसंगी, जाखापूर, कुंडलापूर, वाघोली, गर्जेवडी, शेळकेवाडी, रायवाडी, नागज, दुधेभावी  यासह  इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या गावांमध्ये टेंभू योजनेचा सर्वे झाला. मात्र पाणी कधी येणार याबाबत सांगली पाटबांधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता हणमंत गुणाले यांना विचारणा केली.

यावर हणमंत गुणाले यांनी सांगितले, टेंभू योजनेवर एकूण 234 गावे आहेत. पाचव्या टप्प्याव्दारे घाटमाथ्यावरील 22 गावांना पाणी देण्यात येणार आहे. खासदार पाटील यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून 1280 कोटी रुपये रुपये मंजूर आहेत. खासदार पाटील म्हणाले,  केंद्र शासनाच्या नियोजन आराखड्यामध्ये 3 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद दुष्काळी तालुक्यांसाठी तर 6 हजार कोटी रुपये अतिअवर्षणग्रस्त भागातील सिंचन योजनांसाठी नियोजित होते. नुकताच या खात्याचा पदभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवलेला आहे. गडकरी यांनी या निधीत वाढ करून 8 हजार कोटी दुष्काळी आणि 11 हजार कोटी अतिअवर्षणग्रस्त भागासाठी नियोजित करून  सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे.

घाटमाथ्यावरील 22 गावांना पाणी देण्यासाठी बळीराजा सिंचन योजनेतून 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यामाध्यमातून बंद वाहिका बसविल्या जाणार आहेत. येणार्‍या 6 महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.  यावेळी अरूण शिंदे, विशाल शिंदे, संतोष शिंदे, प्रशांत शिंदे, वामन कदम, पांडुरंग पाटील, अर्जुन पाटील, सुशांत पोळ, प्रल्हाद हाक्के, विजय हाक्के, सूर्यकांत पाटील, तुकाराम शिंदे, राजाराम शिंदे, रमेश पाटील, दयानंद साबळे उपस्थित होते.