Sun, Jun 16, 2019 02:09होमपेज › Sangli › आयुक्तांची विष्णु माने यांना फौजदारी नोटीस

आयुक्तांची विष्णु माने यांना फौजदारी नोटीस

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:35PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने यांनी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्यावर महासभेत वैयक्तिक टीका केल्याबद्दल माने यांना फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. खेबुडकर यांच्यावतीने अ‍ॅड.किरण नवले यांनी ही नोटीस बजावली आहे. माने यांनी गैरवर्तन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडेही तक्रार केल्याचे नोटिसीत म्हटले आहे.  माने यांच्यावर फौजदारीचा व अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही नोटिसीत म्हटले आहे.

महासभेत आयुक्तांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीसह सर्वच नगरसेवकांनी आक्रमक पवित्र घेतला होता.  खेबुडकर यांनी जाणीवपूर्वक विकासकामांच्या फाईल रोखल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला होता होता. यावेळी विष्णु माने यांनी आयुक्तांवर जोरदार टीका केली होती.  त्यांच्याइतका भ्रष्ट आयुक्त आतापर्यंत झाला नाही असाही आरोप केला होता. त्यानंतर  खेबुडकर यांनी नगरसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यानुसार आज  माने यांना नोटीस मिळाली. 

 नोटीसीत म्हटले आहे, आयुक्त हे एक कर्तव्यदक्ष  व  शासनाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कायद्याने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे. त्यांनी आतापर्यत कधीही आणि कुठेही बेकायदेशीर काम केलेले नाही. असे असताना माने यांनी बदनामी केली आहे.   नगरसेवकांच्या दोन लाखाच्या कामात अनेक त्रुटी काढणारे आयुक्त ड्रेनेज ठेकेदाराला गुपचूप बिले देतात, तीन-तीन आलिशान गाड्या रात्रीत ऐनवेळचा ठराव करुन खरेदी करतात.

सुटीच्या दिवशीही वर्कऑर्डर दिल्या जातात, अशा पध्दतीने बेछूट आरोप केले आहेत. यामुळे जनमानसात  खेबुडकर यांची बदनामी झाली आहे.  एकच दुष्ट व आंतरिक हेतू ठेवून माने यांनी आरोप केल्याचे म्हटले आहे.  विकासाच्या योजना,शासकीय योजना नियमाप्रमाणे पूर्ण करण्यावर खेबुडकर यांनी भर दिल्याने काहींचे हितसंबध दुखावले आहेत. यामुळेच असे खोटे,चुकीचे ,बेछूट आरोप केले आहेत, असा नोटिसीत दावा केला आहे.