Wed, Aug 21, 2019 15:21होमपेज › Sangli › वारणानगर चोरी; ९२ जणांची चौकशी सुरू

वारणानगर चोरी; ९२ जणांची चौकशी सुरू

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:25AMसांगली : प्रतिनिधी

वारणानगर येथील 9 कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटीलसह अन्य संशयितांना नोटाबंदी नंतरच्या काळात दोनहून अधिक कॉल केलेल्यांची सीआयडीने चौकशी सुरू केली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 92 हून अधिक जणांचा समावेश आहे. दरम्यान, यामध्ये काही पोलिसांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
मिरजेतील बेथेलहेमनगर येथे साडेतीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. मैनुद्दीन मुल्लाकडून ही रोकड जप्त करण्यात आली होती. त्याने ती रक्‍कम वारणानगर येथून चोरल्याचे सांगितले होते. त्यानंतर निरीक्षक घनवटसह पथक तपासासाठी वारणानगर येथे गेले होते.   

त्यावेळी तेथील नऊ कोटींची रक्कम चोरल्याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार दीपक पाटील, रवि पाटील, कुलदीप कांबळे, शंकर पाटील, शरद कुरळपकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कुरळपकर वगळता सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. सध्या सर्वजण कोल्हापूर येथील कारागृहात आहेत. याप्रकरणी सीआयडीने दोषारोपपत्रही दाखल केले आहे. मात्र या प्रकरणातील फिर्यादी झुंझारराव सरनोबत यांनी या चोरीचा तपास योग्य रीतीने होत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे सीआयडीने आता नोटबंदीच्या काळात या संशयितांना दोनपेक्षा अधिकवेळा कॉल केलेल्यांची चौकशी सुरू केली आहे.

यामध्ये खासगी व्यक्तींसह पोलिसांचाही समावेश आहे. त्याशिवाय आतापर्यंत ज्यांची चौकशी करण्यात आली आहे त्यांच्याकडून नोटबंदीच्या काळातील बँकेचे स्टेटमेंटही घेण्यात येत आहे. कोणत्या कारणासाठी कॉल केले होते. तसेच संशयितांकडून काही रक्कम घेतली आहे का याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.  वारणानगर प्रकरणात सीआयडीने पुन्हा चौकशी सुरू केल्याने पोलिस वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान यातील संशयितांना जामीनासाठी अर्ज दाखल केले होते मात्र ते फेटाळून लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.