Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Sangli › अ‍ॅट्रॉसिटीचा वाईट वापर होतोय : भिडे

अ‍ॅट्रॉसिटीचा वाईट वापर होतोय : भिडे

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 1:26AM

बुकमार्क करा
सांगलीः प्रतिनिधी

देशात अ‍ॅट्रॉसिटीचा अतिशय वाईट वापर सुरू आहे. लोकशाहीचा, घटनेचा अवमान झाला आहे. सत्तापिपासू लोकांनी हिंसाचार घडवून आणला आहे. याप्रकरणी मी न्यायालयीन, सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. ते म्हणाले, मी मोबाईल वापरत नाही. त्यातील मला काहीही कळत नाही. वढूमधील घटना घडण्यापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपवर भिडे गुरुजी तेथे सभा घेणार असल्याचा मेसेज पसरवला जात होता. वास्तविक गेल्या अडीच ते तीन वर्षांत मी वढू गावी गेलो नाही. पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने आता असा खोटा मेसेज पसरविणार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे. वढूमध्ये झालेल्या दगडफेकीवेळी मी तेथे उपस्थित असल्याचे साबळे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

मी जर तेथे होतो, तर तेथील कॅमेर्‍यात त्याचे पुरावे सापडले  असतील. त्याद्वारे पोलिसांनी तपास करावा. यामध्ये जे दोषी असतील, अगदी मी जरी दोषी असलो तरी दोषींना कठोरात कठोर अशी देहांताची शिक्षा देण्यात यावी. प्रकाश आंबेडकर यांनी मी, भुगे आणि एकबोटे यांच्यावर दगडफेकप्रकरणी आरोप केले आहेत.  त्यांना आमची नावे सांगणार्‍यांचीही चौकशी करण्याची गरज आहे, असेही भिडे म्हणाले. भिडेंना पोलिस संरक्षण... शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना असलेला संभाव्य धोका ओळखून पोलिस प्रशासनाने त्यांना चोवीस तास संरक्षण पुरविले आहे.