Mon, Nov 19, 2018 14:44होमपेज › Sangli › सांगलीत उद्या अपुरा पाणीपुरवठा

सांगलीत उद्या अपुरा पाणीपुरवठा

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:51PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

येथील माळबंगला ते काळीखण  पाईपलाईनची क्रॉस कनेक्शन आणि दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख टाक्यांमध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, बुधवारी शहरातील प्रमुख उपनगरांत पाणीपुरवठा ठप्प होणार असल्याचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये यांनी सांगितले.

ते म्हणाले,  मुख्य जलवाहिनीचे माधवनगर रस्ता माळबंगला केंद्रासमोर क्रॉस कनेक्शन करावयाचे आहे. तसेच माळबंगला केंद्र पंपहाऊसजवळ 700 एमएम पाईपलाईनची गळती काढण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे.  परिणामी बुधवारी पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे पाणी जपून वापरावे.

शुक्रवारी कुपवाडला टंचाई

उपाध्ये म्हणाले, माळबंगला येथून कुपवाड कापसे टाकीला जाणार्‍या मुख्य 600 एमएम जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन व टी व्हॉल्व बसविण्याचे काम गुरुवारी (दि. 18) होणार आहे. त्यामुळे कुपवाडला शुक्रवारी  पाणीपुरवठा होणार नाही.