Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Sangli › खुशखबर : सांगलीसाठी होणार स्वतंत्र विद्यापीठ

खुशखबर : सांगलीसाठी होणार स्वतंत्र विद्यापीठ

Published On: Apr 13 2018 8:00PM | Last Updated: Apr 13 2018 8:04PMसांगली : प्रतिनिधी                                                                                                                                      

सांगलीतील विद्यार्थ्यांना आता कोल्हापुरात शिक्षणासाठी यावे लागणार नाही. कारण सांगली जिल्‍ह्‍यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होणार असून, पहिल्या टप्यात उपविद्यापीठाची स्‍थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणार्‍या जागे संदर्भात शिवाजी विद्यापीठाचे  कुलगुरू देवानंद शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकार्‍यांची आज शुक्रवार (दि.13 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यासाठी लवकरच जागा निश्‍चित करुन, पंधरा दिवसात हा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सांगलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, किंवा किमान उपकेंद्र तरी व्हावे,  अशी मागणी अनेक वर्षापासून आहे.  शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर असे चार जिल्हे होते. कोल्हापूर पासून सोलापूरचे अंतर जास्त असल्याने सोलापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर काही वर्षापूर्वी सोलापूरला स्वतंत्र विद्यापीठ करण्यात आले. नवीन विद्यापीठ कायद्या नुसार विद्यापीठ वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सोलापूर प्रमाणे सांगलीतही   पहिल्या टप्यात उपकेंद्र करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान शंभर एकर जागेची गरज आहे. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. 

बैठकीस कुलगुरु शिंदे, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर,  विद्यापीठाचे अधिकारी, प्राचार्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. डी. जी. कणसे, मिरज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. टी. कारंडे, तासगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीत जिल्ह्यातील चार जागांबाबत चर्चा झाली. त्यातून  तीन ठिकाणच्या जागा विद्यापीठ प्रशासनास सुचविण्यात आल्या आहेत. प्रस्तावीत जागा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी, रस्ते आणि पाण्याची चांगली सोय असावी यासाठी प्रयत्न असणार आहेत. पंधरा दिवसात विद्यापीठ प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून या जागांची पाहणी केल्यानंतर त्याचा अंतिम प्रस्ताव सरकारकडे दिला जाणार आहे.