होमपेज › Sangli › जानेवारीपासून न्यायालयीन काम नवीन इमारतीत

जानेवारीपासून न्यायालयीन काम नवीन इमारतीत

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 9:55PM

बुकमार्क करा

सांगली : शिवाजी कांबळे

सांगलीतील न्यायालयाचे दप्तर विजयनगर येथील नवीन इमारतीत स्थलांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. नवीन इमारतीमध्ये जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून (26 जानेवारीपर्यंत) नियमित न्यायालयीन कामकाज सुरू होण्याची चिन्हे आहेत. 14 डिसेंबर रोजी बांधकाम विभागाकडून न्यायालय प्रशासनाला ‘ए’ विंगची इमारतीचा न्यायालय प्रशासनाकडे ताबा दिला जाणार आहे. सध्या सांगली येथे अपुर्‍या जागेत न्यायालयीन कामकाज चालते. अपुर्‍या जागेमुळे अजून सुमारे 10 न्यायाधीशांच्या नियुक्त्या लांबणीवर पडल्या आहेत. नवीन इमारत झाल्यानंतर त्या ठिकाणी 26 न्यायालये सुरू होणार आहेत. यामध्ये प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश, 7 जिल्हा सत्र न्यायाधीश, सहा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व 12 प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांचा समावेश होईल. सध्याच्या जागेत सुमारे 16 न्यायाधीश काम करतात. नवीन  इमारतीत 26  न्यायाधीश काम करू शकतात. याचा परिणाम प्रलंबित 

खटले लवकर निकाली लागण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिष्ठ,  जिल्हा सत्र न्यायाधीश  व्ही. बी. काकतकर, वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, न्यायालय प्रबंधक सौ. व्ही. व्ही. कुलकर्णी, कोर्ट मॅनेजर एस. एन. कुलकर्णी, संगणक प्रमुख सुदर्शन रोटीथोर यांनी जोरदार पाठपुरावा केला आहे. स्थलांतर सुरू झाले
पूर्वी सांगलीत हायकोर्ट होते. त्यामुळे 1830 पासून म्हणजेच पावणे दोनशे वर्षाचे दप्तर न्यायालयाच्या रेकॉर्ड रुममध्ये आहे. या रेकॉर्ड रुममधील जुने रेकॉर्ड हलविण्याचे काम अधीक्षक श्रीमती कुरणे यांच्या निरीक्षणाखाली सुमारे 25 कर्मचारी गेले 20 दिवस काम करत आहेत.

जुने वर्षनिहाय कागदपत्रांचे गठ्ठे काढून, साफसूफ करून पुन्हा नव्या कापडात गठ्ठे बांधून ते गठ्ठे नवीन इमारतीत हलविण्यात येत आहेत. ब्रिटिशकालीन व संस्थान कालीन दप्तराचा यामध्ये समावेश आहे. आत्तापर्यंत सुमारे 20 टक्के रेकॉर्ड नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. संपूर्ण रेकॉर्ड हलविण्यास आणखी दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे. ‘ए’ विंग पूर्ण सुमारे 24 कोटी रुपये खर्चाची ‘ए’ विंगची इमारत पूर्ण झाली आहे. या इमारती संदर्भात उच्च न्यायालयामध्ये वकील संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर 14 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून न्यायालय प्रशासनाला ‘ए’ विंग इमारतीचे ताबापत्र दिले जाणार असल्याचे समजते. ‘बी’ विंगचे काम प्रगतिपथावर आहे.  तेथे औद्योगिक, कामगार, सहकार व कौटुंबिक न्यायालय, एटीएम सेवा, पोस्ट कार्यालय सुरू होणार  आहे.

संपूर्ण इमारतीसाठी सहा लिफ्ट, आठ ठिकाणी वॉटर फिल्टरची सोय, याशिवाय फायर ब्रिगेडची सोय करण्यात आली आहे. सुमारे 200 इंटरकॉम फोन व 52 इंची चार डिसप्ले स्क्रीनची सोय करण्यात येणार आहे.वकील बाररुम व आवश्यक त्या ठिकाणी डिस्प्ले लावण्यात येणार आहेत. या डिस्प्लेवर कोणत्या न्यायालयात कोणते कामकाज सुरू आहे. याबाबतची माहिती वकील व पक्षकारांना जागेवर मिळणार आहे. 27 हजार 78 खटले प्रलंबित जिल्ह्यामध्ये सुमारे 64 हजार खटले व दावे प्रलंबित आहेत. सांगलीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयात एकूण 27 हजार 78 खटले व दावे प्रलंबित आहेत. यापैकी सत्र न्यायालयात 8 हजार 328 दिवाणी व 3 हजार 198 फौजदारी खटल्यांचा समावेश आहे. तसेच प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व वरिष्ठ दिवाणी न्यायालयामध्ये 6 हजार 888 दिवाणी व 8664 फौजदारी खटल्यांचा समावेश आहे. या इमारतीत 26 न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास 27 हजार 78 खटले लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे.