Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › ‘तो’ मृतदेह अनिकेतचाच!

डीएनए चाचणी: ‘तो’ मृतदेह अनिकेतचाच!

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 1:41AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडीत मारहाण करून त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. आंबोलीतील कावळेसाद येथे सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच असल्याचे डीएनए चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाल्याची माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणात  दि. 6 नोव्हेंबरला अनिकेत कोथळे आणि  अमोल भंडारी यांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यादिवशी रात्री पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथीदारांनी कोठडीत मारहाण करून अनिकेतचा खून केला. त्यानंतर अनिकेतसह अमोलने पलायन केल्याचा बनावही केला.

दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी आंबोलीतील कावळेसाद येथे कामटेने अनिकेतचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली. अनिकेत कोठडीतून बेपत्ता झाल्यानंतर दि. 7 रोजी त्याच्या कुटुंबीयांनी सांगली शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या  आंदोलन केले. त्या दिवशी रात्री अनिकेतचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दि. 8 नोव्हेंबरला पोलिसांनी तातडीने हालचाली  करून पोलिस उपनिरीक्षक युवराज  कामटे, हवालदार अनिल लाड , अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली. 

दि. 9 नोव्हेंबररोजी पोलिसांनी कावळेसाद येथे इन कॅमेरा पंचनामा करून अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो मिरजेतील शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. तेथेही इन कॅमेरा उत्तरीय तपासणी केल्यानंतर डीएनए तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले. तर अनिकेतचा मृतदेह शवागरात ठेवण्यात आला. त्यानंतर कामटेला मदत केल्याप्रकरणी तसेच कामात हयगय केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कोथळे कुटुंबियांसह सर्व पक्षीय कृती समितीने केली होती. त्यानंतर दि.  23 नोव्हेंबरला दोघांचीही बदली करण्यात आली. त्यांची बदली होईपर्यंत सर्व पक्षीय कृती समितीने विविध आंदोलने केली. 

शिंदे व काळे यांची बदली झाल्यानंतरही अनिकेतच्या मृतदेहाबाबत काहीच निष्पन्न होत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी सांगली शहर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर मात्र चक्रे वेगाने फिरली. डीएनए चाचणीचा अहवाल सीआयडीला मिळाला असून तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याबाबत सीआयडीकडून आज (मंगळवार) अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.