Mon, Apr 22, 2019 21:40होमपेज › Sangli › सांगली तालुक्याचा प्रस्ताव निधीसाठी रखडला?

सांगली तालुक्याचा प्रस्ताव निधीसाठी रखडला?

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 29 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी

मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुका निर्मितीसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पहिल्या टप्यात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केलेली फाईल मंत्रालयातील वित्त विभागाकडे पडून आहे. निधीअभावी हा प्रस्ताव अडल्याची चर्चा आहे. 

सध्याचा मिरज तालुका हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्यादृष्टीने खूपच मोठा आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार शहरी भागाची लोकसंख्या 5 लाख 28 हजार 627  तर ग्रामीण भागाची लोकसंख्या 3 लाख 25 हजार 954 आहे. गेल्या सहा वषार्ंत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

लोकसंख्या वाढत असल्याने कामाचा ताण मिरज तहसील कार्यालयावर वाढतो आहे. त्या शिवाय तालुक्याच्या पश्‍चिम भागात राहणार्‍या लोकांना मिरजेतील कार्यालयाच्या ठिकाणी येण्यासाठी अंतर जास्त आहे. सावळवाडीपासून मिरज हे 35 किलोमीटर अंतरावर आहे. 

मिरज तालुक्याचा भाग हा सध्या वाळवा, सांगली आणि मिरज अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामुळे स्वतंत्र तालुका करण्यात यावा, अशी मागणी आहे. त्यासाठी आमदार गाडगीळ यांचा पाठपुरावा सुरू आहे. 

जत तालुक्याचे त्रिभाजन करावे, अशी जोरदार मागणी गेली कित्येक वर्षे  होत आहे. शासनाने तूर्त त्यावर एक तोडगा काढला आहे.  संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले  आहे.  त्याच पद्धतीने पहिल्या टप्यात अप्पर तहसील कार्यालय सांगलीतील  जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात  सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नियोजित सांगली तालुक्यात सांगली, कसबे डिग्रज आणि बुधगाव या तीन मंडलमधील 26 गावांचा समावेश असेल. यापैकी चार गावे महापालिका क्षेत्रात तर उर्वरित 22 गावे ग्रामपंचायत हद्दीत आहेत. सांगली, अंकली, इनामधाणी, सांगलीवाडी, हरिपूर, कर्नाळ, पद्ममाळे, कसबेडिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, दुधगाव, सावळवाडी, कवठेपिरान, मोळा कुंभोज, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वॉन्लेसवाडी, बामणोली, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी आणि माधवनगर या गावांचा यात समावेश आहे. 

अप्पर तहसीलमध्ये निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार आणि संगयो नायब तहसीलदार असे चार अधिकारी, अव्वल कारकून 3, लिपिक 10, शिपाई 5 वाहन चालक 1 असे  कर्मचारी असणार आहेत. 

सांगलीस स्वतंत्र तालुका आणि सुविधा दिल्या गेल्यास  पश्‍चिम भागातील लोकांचा त्रास कमी होणार असून त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. प्रस्तावाची फाईल सध्या मंत्रालयातील वित्त विभागात पडून आहे. अप्पर तहसील कार्यालय स्थापनेची घोषणा होऊन महाराष्ट्र दिनी त्याचे कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापि निर्णय झाला नाही. 

Tags : Sangli taluka, proposal Stopped, funding,