Fri, Mar 22, 2019 00:13
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगली तालुका निर्मितीला मुहूर्त कधी?

सांगली तालुका निर्मितीला मुहूर्त कधी?

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 9:49PMसांगली :शशिकांत शिंदे

गेल्या अनेक वषार्ंपासून मागणी, गरज आणि इमारत सुविधा  असूनही सांगली तालुक्याची निर्मिती  रखडली आहे. त्यासाठी मुहूर्त केव्हा, असा सवाल विचारला जात आहे.

जिल्ह्यातील पलूस, कडेगाव या स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती  झाली. जत तालुक्याच्या विभाजनाची बर्‍याच वर्षांची मागणी होती. त्यादृष्टीने पहिला टप्पा म्हणून संख येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू झाले.  आष्टा येथेही अतिरिक्त तहसीलचा अध्यादेश निघाला आहे. मात्र सांगली तालुक्याचा प्रस्ताव गेली 36 वर्षे रखडला आहे.

भाजपचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी खटपट करूनही सांगली तालुका होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होते आहे. आमदार गाडगीळ यांचे राज्य सरकारमधील वजन घटले की काय, असा प्रश्‍नही नागरिक उपस्थित करीत आहेत.  सांगली तालुक्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

सांगली  जिल्ह्याचे ठिकाण आहे. लोकसंखेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे. सर्व प्रशासकीय इमारती येथे आहेत. प्रसिद्ध गणपती मंदीर, राजवाडा  येथे आहे. तरीही  सांगली शहर मिरज तालुक्यात आहे.  सध्याचा मिरज तालुका हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच मोठा आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार शहरी भागाची लोकसंख्या 5 लाख 28 हजार 627  आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या 3 लाख 25 हजार 954 आहे. 

गेल्या आठ वषार्ंत लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कामाचा ताण मिरज तहसील कार्यालयावर वाढतो आहे. त्याशिवाय तालुक्याच्या पश्‍चिम भागातील  लोकांना तालुका कार्यालयाच्या ठिकाणी ये- जा करण्यासाठी अंतर जास्त आहे. सावळवाडीपासून मिरज हे 35 किलोमीटर अंतर आहे. मिरज पश्चिम आणि मध्य भागातील गावांच्या दृष्टीने मिरजेच्या तुलनेत सांगली जवळचे आहेे. 

मिरज तालुक्याचा भाग हा सध्या वाळवा, सांगली आणि मिरज अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामुळे स्वतंत्र तालुका करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्यासाठी पाठपुरावाही करण्यात आला. सन 1982 पासून त्यासाठीचा प्रस्ताव  शासनदरबारी बासनात पडून आहे. 
विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढतीत सांगलीतून आमदार गाडगीळ चांगल्या मतदाधिक्याने निवडून आले.  सांगलीकरांनी विकास आणि स्वच्छ प्रतिमा या मुद्यांवर गाडगीळ यांना निवडून दिले.

गाडगीळ यांनी निवडून आल्यानंतर सांगली तालुका निर्मितीचा प्रस्ताव तत्कालिन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यामार्फत सरकारकडे पाठवून दिला होता. मात्र चार वर्षे झाले तरी अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यानंतरच्या संख, आष्टा या अतिरिक्त तहसीलच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली.  मात्र जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सांगलीचा प्रस्ताव रखडलेलालच आहे.

दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी मोठा पाठपुरावा करून सुरुवातीस पलूस आणि नंतर कडेगाव तालुक्याची निर्मिती करुन घेतली. त्या ठिकाणी शासनाच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीही उभारल्या गेल्या. त्या प्रमाणे सांगलीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत . सांगलीत  जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची राजवाडा चौकातील जागा सध्या उपलब्ध आहे. त्या जागेचा वापर तहसील कार्यालयासाठी होऊ शकतो.