Thu, Apr 25, 2019 12:15होमपेज › Sangli › अखेर ताकारी  पाणी योजनेचे आवर्तन सुरू

अखेर ताकारी  पाणी योजनेचे आवर्तन सुरू

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:52PM

बुकमार्क करा
देवराष्ट्रे :  वार्ताहर

जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे दोन  महिन्यांपासून लांबलेले आवर्तन अखेर सुरू झाले. शुक्रवारी सायंकाळी महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत केल्यानंतर शनिवारी सकाळी योजनेचे पंप सुरू करण्यात आले. योजना सुरू झाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला जीवदान आणि शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. कोयनेतून योजनेसाठी दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे.

जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील शेतकरी ताकारीच्या पाण्याकडे डोळे लावून बसले होते. गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतातील हातातोंडाला आलेली पिके वाळून गेली होती. काही वाळू लागली होती. शिवाय रब्बी हंगामातील पिकांनाही जोरदार फटका बसला आहे. ताकारी योजनेचे 10 कोटी 36 लाख रूपये वीजबिल थकित असल्याने योजनेचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर लाभक्षेत्रातील साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून कपात केलेली पाणीपट्टी व अ‍ॅडव्हान्स अशी 5 कोटी 20 लाख रूपयांची रक्कम महावितरणला जमा केली होती.तरीही उरलेल्या रकमेचे काय? हा मुद्दा उपस्थित करून महावितरण कंपनीने आडमुठी भूमिका घेतली होती.

 गुरूवारी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व आमदार अनिल बाबर यांनी मुंबई येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून उरलेल्या रकमेचे तीन समान हप्ते करून घेतले होते. यानंतर महावितरणच्या अधिकार्‍यांनी योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी सायंकाळी महावितरणच्या अधिकार्‍यांनी योजनेचा वीजपुरवठा पुर्ववत केला आहे.पाटबंधारे विभागाने योजना सुरू करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून तयारी केल्याने योजनेच्या साटपेवाडी बंधार्‍यावर पाण्याची पातळी तयार होती. त्यामुळे योजनेच्या टप्पा. क्र. 1 वरील विद्युत पंप सुरू करण्यात आले आहेत. 

 सुरवातीला थोडे पंप सुरू करून नंतर त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहेत.तसेच सध्या नदीमध्ये पाणी कमी असून तात्पुरते टेंभूतून पाणी सोडण्याची विनंती केली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. ताकारीचे आवर्तन सुरू झाल्यामुळे वाळत चाललेल्या शेतीला जीवदान मिळणार आहे. शिवाय शेतकर्‍यांचे होणारे आर्थिक नुकसान थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे. पाणीपट्टी कमी करण्याची मागणी ताकारी योजनेचे आवर्तन दीड-दोन महिन्यांपासून लांबल्याने ऊस पिकासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसपीक  वाळले आहे. यामुळे वजनात घट आली आहे.  ही नुकसान भरपाई कोण देणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिवाय योजना दोन महिने उशिरा सुरू झाल्याने प्रशासनाने पाणीपट्ट्ी कमी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.