Tue, Apr 23, 2019 19:57होमपेज › Sangli › सांगलीत रविवारी निघणार एकता रॅली

सांगलीत रविवारी निघणार एकता रॅली

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 09 2018 12:05AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनानंतर   जिल्ह्यातील वातावरणाच्या  पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी  सोमवारी  पुढाकार घेऊन प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. त्यात शांतता, सामाजिक सलोखा राहावा, यासाठी येथे रविवारी (दि. 14) सद्भावना आणि एकता रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या रॅलीसाठी महसूलमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक, व्यावसायिक संघटना, शाळा-महाविद्यालये यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी पाटील यांनी आज तातडीची बैठक घेतली. बैठकीस महापालिका आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, प्रांताधिकारी विकास खरात, मिरजेचे तहसीलदार शरद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शहरातून एकता रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून सकाळी नऊ वाजता ही रॅली सुरू होईल. राममंदिर चौक- पंचमुखी मारुती रस्ता- शिवाजी मंडई- महापालिका- राजवाडा चौक- स्टेशन चौक मार्गे जाऊन छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर या रॅलीची सांगता होणार आहे.  त्या ठिकाणी एकतेची शपथ घेऊन तिळगूळ वाटपाचाही कार्यक्रम होणार आहे. 

रॅलीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्या शिवाय सर्व शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.  मिरजेतील विद्यार्थ्यांनाही  सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. रॅलीत सर्वात पुढे पोलिसांचे बँड पथक, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी ,  तिरंगा ध्वज आणि   समतेचा संदेश देणारा पोवाडा असणार आहे. 

रॅलीच्या तयारीसाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता विविध संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.त्यावेळी रॅलीच्या  तयारीचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.