Sun, Jul 21, 2019 08:06होमपेज › Sangli › आता शिवसेनाही मनपा निवडणुकीसाठी मैदानात

आता शिवसेनाही मनपा निवडणुकीसाठी मैदानात

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:55PM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी आता अनेक पक्षांनी बाह्या सरसावल्या आहेत. भाजपने नुकतेच रणशिंग फुंकले. त्यापाठोपाठ आता सोमवारी (दि. 8) शिवसेनेने मेळाव्याद्वारे तोफ डागण्याची तयारी केली आहे. संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अनेकजणांचे पक्षप्रवेशही होणार आहेत. मात्र, याबाबत  गोपनीयता ठेवण्यात आली आहे.

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली दौर्‍यात महापालिका कारभारावर टीकेची झोड उठवली होती. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संधी दिल्यास मुंबईप्रमाणे विकास करू, असे जाहीर करीत मैदानात शिवसेना उतरल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनीही सांगलीत येऊन महापालिका कारभाराचा पंचनामा केला होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या पक्षाचा अप्रत्यक्ष का होईना पण महापालिकेत प्रवेश झाला आहे. अन्य काही नगरसेवकही शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्या पत्नी सौ. पद्मिनी जाधव या काँगे्रसच्या नगरसेविका आहेत. माजी आमदार संभाजी पवारांचे पुत्र युवानेते पृथ्वीराज पवार यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्यासह स्वाभिमानीचे नगरसेवक गौतम पवार यांचा गटही शिवसेनेशी संलग्न आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना ताकदीने मैदानात उतरू शकते. त्यादृष्टीनेच हा मेळावा एक तयारी असेल, अशी चर्चा आहे.  जिल्हा व महापालिका क्षेत्रात शिवसेना वाढीच्या उद्देशाने हा मेळावा आहे, असा दावा  शेखर माने यांनी केला.  शिवसेना तळा-गाळात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष सदस्य नोंदणी या मेळाव्यात प्रारंभ होणार आहे, असे ते म्हणाले.  ते म्हणाले,  विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश  होणार आहे.  मेळाव्यास जिल्हाध्यक्ष संजय विभूते, आनंदराव पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.