Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Sangli › वाहन उद्योगाला आले अच्छे दिन

वाहन उद्योगाला आले अच्छे दिन

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 9:29PM

बुकमार्क करा

सांगली ः शशिकांत शिंदे 

वाहन उद्योगाला ‘अच्छे दिन’ आले असल्याचे दिसत आहे. कारण राज्यात वाहन विक्रीत गेल्या पाच वर्षात सरासरी 9 टक्के वाढ झाली असून महाराष्ट्रातील वाहनांची संख्या 3 कोटी 10 लाखावर गेली आहे. सांगली जिल्ह्यात तर गेल्या सात महिन्यात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. एकूण वाहने आठ लाखावर आहेत. गेल्या पाच वर्षापासून वाहनांच्या विक्रीत सरासरी 9 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2017 मध्ये राज्यात एकूण वाहने 3 कोटी 2 लाखावर होती. त्यात दुचाकीची संख्या 2 कोटी 21 लाख होती. पाच वर्षापूर्वी एकूण वाहने 2 कोटी 33 लाख तर दुचाकी 1 कोटी 54 लाख होत्या.
सांगली जिल्ह्यात आठ लाखावर वाहने आहेत. त्यात दुचाकी साडेपाच लाख आहेत.  

गेल्या सात महिन्यात जिल्ह्यातील वाहन विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2016 ते नोव्हेंबर 16 या कालावधीत एकूण वाहन विक्री 22 हजार 662 झाली. त्यात दुचाकी 17 हजार 302 होत्या. यावर्षी याच कालावधीत 45 हजार 707 वाहनांची विक्री झाली आहे. त्यात दुचाकी 36 हजार 780 आहेत. वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे सरकारला जमा होणार्‍या महसुलात 21 कोटीने वाढ झाली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र हा सधन मानला जातो. त्यात सांगली जिल्ह्यात ऊस, द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाला ही नगदी पिके घेतली जातात. त्यामुळे  लोकांच्या हातात पैसा येत आहे. पैशापेक्षा वेळेला महत्व वाढत असल्याने वाहनांची संख्या वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागापेक्षा शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. अनेकांच्या घरी दोन- तीन वाहने आहेत. राज्यात वाहनांच्या संख्येत पुणे विभाग सर्वाधिक 62 लाख तर सर्वात कमी धुळे विभागात 14 लाख वाहने आहेत. गेल्या काही वर्षात वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणार्‍या अनेक बँका, कंपन्या आल्या आहेत. कमी व्याज दर, आकर्षक बक्षीस योजना यामुळे वाहन खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. विशेषत: कार खरेदीची संख्या वाढत आहे. राज्यात मार्च 2017 पर्यंत कारची संख्या 37 लाखावर होती. पुढील काही वर्षे वाहनांची संख्या वाढतच जाईल, असा या उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.