होमपेज › Sangli › दोनशे कोटींतून सांगलीचे शांघाय झाले असते

दोनशे कोटींतून सांगलीचे शांघाय झाले असते

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:28PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

आयुक्तांनी दोन वर्षांत 188 कोटी रुपयांची कामे केली असती तर सांगलीचा कायापालट होऊन शांघाय झाले असते, असा प्रतिटोला राष्ट्रवादीने पत्रकार बैठकीत लगावला. राष्ट्रवादीने कामांसाठी अनेकवेळा आंदोलने केली. तरीही कागदोपत्री मंजुरीचा खेळ करून आयुक्तांनी वर्क ऑर्डर न देता कामे अडविली आहेत, असा आरोपही विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केला. 
जर आठ दिवसांत वर्कऑर्डर देऊन कामे सुरू केली नाहीत, तर 13 डिसेंबरपासून महापालिकेसमोर अखंड सत्याग्रह सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून मंजूर विकास कामाच्या फाईल रखडल्या आहेत. निविदा काढल्या, पण त्यांना दरमान्यता देण्यात आली नाही. मग ही कामे मंजूर करून  उपयोग काय? आयुक्तांनी फाईलींमध्ये गैरकारभार आणि बोगसगिरी असल्याचा आरोप केला आहे. अशा कोणाच्या बोगस फाईल आहेत, तेही त्यांनी जाहीर करावे. मोहिते म्हणाले, मिरजेच्या अमृत पाणी योजनेच्या जादा दराच्या निविदेला स्थायी समिती, महासभेतही विरोध केला होता. तरीही वाढीव साडेआठ टक्के दराने निविदा मंजूर करून परस्पर 12.50 कोटी रुपयांचा भुर्दंड मनपावर टाकला आहे. याबाबत येत्या महासभेत आम्ही जाब विचारू.

 गायकवाड म्हणाले, महासभेत विरोधात बोलणार्‍या नगरसेवकांवर  बदनामीचा  दावा करू, अशा धमक्या आयुक्त देत आहेत. आमचा-तुमचा काही बांधाला बांध लागलेला नाही. शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुमची विकासकामांची जबाबदारी आहे. ती करून घेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याचा जाब तुम्हाला नाही तर कोणाला विचारणार?  ते म्हणाले, एकीकडे लाख-दोन लाखांची कामे आयुक्त अडवितात, मग घनकचरा प्रकल्प, हॉटेलमधील कचरा उठाव, अमृत योजना अशी  इंटरेस्टची कामे दोन दिवसात बेकायदेशीररित्या मंजूर कशी होतात?

आयुक्तांनी ज्या कामे मंजूरचा दावा केला आहे, ती अनेक कामे तत्कालिन आयुक्तांच्या काळातील  आहेत. नगरसेवक दिग्वीजय सूर्यवंशी म्हणाले, पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त होण्यासाठी आम्ही गेल्यावर्षी मुरुमीकरणाची मागणी केली होती.  मात्र मी मुरुम टाकणार नाही, असा पवित्रा आयुक्तांनी घेतला. मग आता  1.25 कोटी रुपयांच्या मुरूम पॅचवर्कच्या निविदा का काढल्या? रस्ते कामे होत असताना मुरुम कुठे टाकणार? हे काय गौडबंगाल आहे?