Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Sangli › सांगलीची  पिवळी  हळद  झाली  ‘गोरी’

सांगलीची  पिवळी  हळद  झाली  ‘गोरी’

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 10:45PMसांगली ः प्रतिनिधी

सांगलीच्या हळदीला पेटंटच्या मुंबई कार्यालयाकडून जी. आय. (जिऑग्राफीकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे. उत्पादक शेतकर्‍यांना सामूहिक अधिकार मिळाला आहे. सांगलीची हळद ही आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘ब्रँड’ म्हणून नावारुपास आली आहे. त्याचा लाभ शेतकरी, व्यापार्‍यांना होणार आहे. प्रा. गणेश हिंगमिरे (पुणे) यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला आहे. 

सांगलीची हळद ‘राजापुरी हळद’ या नावाने ओळखली जाते. सांगली ही हळदीची देशातील प्रमुख बाजारपेठही आहे. हळदीचा वायदेबाजार पूर्वी सांगलीतून होत होता. जमिनीत पेवांमधील साठवण पद्धत हे सांगलीच्या हळदीचे वैशिष्ट्य आहे. जी. आय. मानांकनासाठी हे वैशिष्ट्य महत्वपूर्ण ठरले आहे. केशरी, पिवळसर रंग, माती-पाण्याचा गुणधर्म यामुळे सांगलीची हळद वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

या हळदीची परदेशात निर्यातही होते. हळदीतील करक्युमिनच्या प्रमाणाच्या जोरावर वर्धा जिल्ह्यातील वायगावच्या हळदीने जी. आय. मानांकन मिळवलेले आहे. सांगलीच्या हळदीचेही एक वेगळे वैशिष्ट असल्याने   जी. आय. मानांकन मिळावे यासाठी प्रा. गणेश हिंगमिरे आणि शिवराज्य हळद उत्पादक स्वयंसहायत्ता संघ शिरढोण यांच्या प्रयत्नांना यश आले. सांगलीच्या हळदीला जी. आय. मानांकन मिळाले आहे. हळद उत्पादक शेतकर्‍यांना सामूहिक अधिकार प्राप्त झाला आहे. 

सर्टीफिकेट चार महिन्यांनी; लोगो तयार करणार: प्रा. हिंगमिरे

प्रा. हिंगमिरे म्हणाले, सांगलीच्या हळदीला मिळालेल्या जी. आय. मानांकनाचे सर्टीफिकेट चार ते पाच महिन्यांनी मिळेल. शिवराज्य हळद उत्पादक स्वसहायता संघ या संस्थेला हे सर्टीफिकेट मिळेल. संस्थेकडून हळद उत्पादकांना त्यांच्या वैयक्तिक नावानेही सर्टीफिकेट मिळू शकेल. सांगलीच्या हळदीचा लोगो तयार केला जाणार आहे.

गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे

सांगलीच्या हळदीला जी. आय. मानांकन मिळाले आहे. आता 10 वर्षांनी त्याचे नूतनीकरण होईल. हळद शेतीची पारंपरिक पद्धत जपली पाहिजे. रासायनिक खते, केमिकल्सचा वापर टाळावा.