Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Sangli ›  सांगलीच्या विकासात प्रदूषणाचा अडथळा

 सांगलीच्या विकासात प्रदूषणाचा अडथळा

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:33PMसांगली : गणेश कांबळे

सांगली शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक अडथळे गेल्या अनेक वर्षापासून उद्भवत आहेत. शुद्ध पाणी, हवा आणि आरोग्य नसल्याने या शहरातील लोकांचा विकास होत नाही. त्यामुळे सांगलीच्या पर्यावरणाला अडथळा ठरणारा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर असून, तो सोडविण्यासाठी पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला तर हे प्रश्‍न सुटू शकतील, असे मत ज्ञानदीप फाऊंडेशनचे एस. व्ही. रानडे आणि मराठी विज्ञान प्रबोधिनीचे अरविंद यादव यांनी व्यक्‍त केले. 

सांगली जिल्हा हा शेतीप्रधान आहे. या भागात साखर कारखाने आणि त्याअनुषंगाने असणारी कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यातून निर्माण होणारे जलप्रदूषणाकडे दुर्लक्ष झालेले आहे. सांगलीतील शेरीनाल्याचा प्रश्‍न 1972 पासून सुरू आहे. त्यावेळी कारखान्याचे पाणी नदीत मिसळल्यामुळे त्यावेळी काविळीची साथ आलेली होती. तेव्हापासून हा प्रश्‍न चर्चेत आला. महापालिकेने शेरीनाल्याचे पाणी धुळगाव येथे नेऊन ते शुध्द करून त्याचा वापर शेतीसाठी करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. तो प्रकल्प झाला तर नदीप्रदूषणाचा प्रश्‍न सुटू शकतो. परंतु, हा प्रकल्प रेंगाळल्यामुळे शेरीनाल्यामुळे दरवर्षी नदी प्रदूषण होऊन लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असतो. 

पर्यावरणाच्या दृष्टीने सांगलीच्या ड्रेनेजचा अडथळाही मोठा आहे. सांगलीची जमीन ही सपाट आणि काळी आहे. त्यामुळे ड्रेनेजची सिस्टीम व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे डासांचे प्रमाण वाढते. दर पाच दिवसांनी ड्रेनेजमध्ये साठलेल्या पाण्याचा उपसा करणे गरजचे आहे. परंतु ते केले जात नाही. 

शहरातील रिकाम्या प्लॉटमध्येही पावसाचे पाणी साचून डास वाढतात आणि आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. शहरातील विविध ठिकाणी असलेले कारखान्यातून सांडपाणी हे नदीत सोडले जाते. तसेच ही पाणी शेतीला देण्यात येते. त्यातूनही नदी प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वचक असणे आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रणाबाबत कायदे कडक आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे हे प्रदूषण वाढत जावून अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत.

तज्ज्ञांच्या अभावामुळे दुर्घटना

महापालिकेकडे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी   तज्ज्ञ लोकांचा अभाव असल्याचे दिसून आले. आहे त्याच कामगारांकडून ही कामे करून घेत असतात. कोल्हापूर रस्त्यावरील टाकी साफ करीत असताना दोघांचा मृत्यू झाला. याबाबत तज्ज्ञ नसल्याचे दिसून येते. सांगलीच्या विकासामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. त्यासाठी जनतेमध्ये पर्यावरणविषयक जागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.