Mon, Mar 18, 2019 19:42होमपेज › Sangli › विश्रामबागमध्ये पोलिसांची कारवाई 

सांगलीत सव्वादोन लाखांची रोकड जप्त

Published On: Jul 31 2018 2:14PM | Last Updated: Jul 31 2018 2:14PMसांगली :  प्रतिनिधी

सांगली-मिरज रस्त्यावर खवय्या हॉटेलसमोर एका मारूती स्विफ्ट गाडीतून पोलिसांनी दोन लाख 17 हजारांची रोकड जप्त केली. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

समित माधव शेट्टी (वय 41, रा. एकता कॉलनी), उमेश दत्तात्रय माने (वय 48, रा. साई बंगला, संजयनगर), विवेक नंदकुमार चव्हाण (वय 24, रा. नांद्रे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत महापालिकेचे वरीष्ठ लिपीक प्रकाश केशवराव साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विश्रामबागचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांचे एक पथक मिरज रस्त्यावर गस्त घालत होते. 

अपक्ष उमेदवाराची रोकड

 प्रभाग क्रमांक नऊमधील एका अपक्ष उमेदवाराची ही रोकड असल्याची चर्चा आहे. त्या उमेदवाराने या तिघांना वाटप करण्यासाठी पैसे आणण्यास सांगितल्याने ते रक्कम घेऊन येत होते. संजयनगरकडे येत असतानाच तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

उमेदवाराच्या पतीकडून रोकड जप्त

शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग्रेसच्या उमेदवार मदिना बारूदवाले यांचे पती इलाही बारूदवाले यांच्याकडून पोलिसांनी 59 हजारांची रोकड मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जप्त केली. बारूदवाले यांच्या विरोधी उमेदवारांनी इलाही बारूदवाले मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

रात्री साडेअकराच्या सुमारास तिघेही मारूती स्विफ्ट गाडीतून (एमएच 10एएन 7437) भरधाव वेगाने जात होते. पोलिसांच्या गस्त पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना खवय्या हॉटेलसमोर थांबवले. त्यानंतर कारची झडती घेतल्यानंतर कारमधील डॅश बोर्डमध्ये तसेच दोन्ही दारांच्या कप्प्यांमध्ये तसेच चालकाच्या सीटखाली पाचशे आणि दोन हजार रूपयांचा नोटा लपवल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेच्या भरारी पथकाला बोलावून याची माहिती देण्यात आली. कारमध्ये लपवलेली दोन लाख 17 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे.