Sun, Apr 21, 2019 02:44होमपेज › Sangli › दोन पिस्तूल काडतुसे कोयते जप्‍त

दोन पिस्तूल काडतुसे कोयते जप्‍त

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:51PMसांगली  : प्रतिनिधी

चुडेखिंडी (ता. कवठेमहांकाळ) येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार राक्या मुंडक ऊर्फ राकेश मधुकर कदम याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, नऊ काडतुसे, कोयता, सत्तूर, वातीची जिलेटिन कांडी, दोन हजारांची रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला. त्याने अपहरण केलेल्या युवकाचीही सुटका केली. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली, अशी   माहिती पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली.

राक्या मुंडक ऊर्फ राकेश मधुकर कदम (वय 28, रा. हनुमाननगर, सांगली), सनी विजयकुमार सहाणी (20, रा. मंगळवार बाजार, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. यावेळी पूर्वीच्या भांडणाच्या रागातून राकेशने अपहरण केलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (19, रा. गुलाब कॉलनी, विश्रामबाग) याची सुटका करण्यात आली.
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश गुंडाविरोधी पथकाला दिले होते. त्यानुसार एक पथक कवठेमहांकाळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना राकेश कदम अपहरण केलेल्या युवकासह घातक हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर राकेशला थांबण्यास सांगितले. मात्र, तो तसाच निघून गेला. पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ दोन पिस्तूल, नऊ काडतुसे, कोयता, सत्तूर, एक वात असलेली जिलेटिन कांडी व दोन हजारांची रोकड सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर पूर्वीच्या भांडणातून श्रीनाथ पंडित याचे अपहरण केल्याची कबुलीही त्याने दिली. यावेळी श्रीनाथची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. याप्रकरणी राकेशसह दोघांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहायक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रूपनर, सागर लवटे, योगेश खराडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. राकेशवर खुनाचे दोन गुन्हे राकेश कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल होते. त्यातून त्याची सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले.